नवी दिल्ली : जन धन योजनेत देशात आर्थिक समावेशन होवून क्रांती घडवून आणली आहे. याअंतर्गत देशात ५० कोटींहून अधिक खाती उघडली जातील असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी सांगितले. त्या म्हणाल्या, जनधन खात्यांमध्ये लोकांनी २ लाख कोटींहून अधिक रक्कम जमा केली आहे. योजनेच्या माध्यमातून लोकांनी बँकिंग व्यवस्थेत मोठे योगदान दिले आहे.
जागरणमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, सरकारने नऊ वर्षांपूर्वी जन-धन योजना सुरू केली. देशातील सर्व नागरिकांचे स्वतःचे बँक खाते असावे, हा या योजनेचा उद्देश होता. जगातील सर्वात मोठ्या आर्थिक समावेशन उपक्रमांपैकी हा एक आहे. याबाबत अर्थमंत्री सीतारामन म्हणाल्या की, योजनेत ५५.५ टक्के महिलांनी बँक खाती उघडली आहेत. तर, ग्रामीण-निमशहरी भागात ६७ टक्के खाती उघडण्यात आली आहेत. योजनेतील बँक खात्यांची संख्या मार्च २०१५ मध्ये १४.७२ कोटींवर होती. ही संख्या ३.४ पटीने वाढून १६ ऑगस्ट २०२३ पर्यंत ५०.०९ कोटींवर पोहोचली आहे.
जनधन योजनेतील खात्यांमध्ये २०१५ मध्ये एकूण १५,६७० कोटी रुपये जमा होते. ही रक्कमही आता ऑगस्ट २०२३ पर्यंत वाढून २.०३ लाख कोटींहून अधिक झाली आहे. जन धन खात्यातील सरासरी जमा १०६५ रुपयांवरून ३.८ पटीने वाढून ऑगस्टमध्ये ४,०६३ रुपये झाली आहे. या योजनेने देशात अर्थक्रांती घडवली असे अर्थमंत्री सीतारमण यांनी सांगितले.