कराड : जयवंत शुगर्स साखर कारखान्याने गेल्या हंगामात २०२२-२३ मध्ये गळीतास आलेल्या ऊसाला प्रती टन ५० रुपयांप्रमाणे अंतिम ऊसबिल देण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या २७ ऑक्टोबरला ही रक्कम ऊस उत्पादकांच्या बँक खात्यावर वर्ग केली जाईल. त्यामुळे जयवंत शुगर्सच्या ऊस उत्पादकांना गेल्या हंगामाच्या ऊसबिलापोटी मिळणारी एकूण रक्कम ३००१ रुपये इतकी होईल, अशी माहिती जयवंत शुगर्सचे संस्थापक डॉ. सुरेश भोसले यांनी दिली. धावरवाडी (ता. कराड) येथे विजयादशमीच्या मुहूर्तावर जयवंत शुगर्सच्या १३ व्या गळीत हंगामाला उत्साहात प्रारंभ झाला. त्यावेळी ते बोलत होते.
कारखाना कार्यस्थळावर कारखान्याचे संस्थापक तथा य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले व त्यांच्या पत्नी उत्तरा भोसले यांच्या हस्ते गव्हाणीत ऊसाची मोळी टाकून गळीत हंगामाचा प्रारंभ करण्यात आला. कृष्णा सहकारी बँकेचे चेअरमन डॉ. अतुल भोसले, विनायक भोसले, जयवंत शुगर्सचे चेअरमन चंद्रकांत देसाई, प्रेसिडेंट सी. एन. देशपांडे, सरव्यवस्थापक एन. एम. बंडगर आदी उपस्थित होते.
अध्यक्ष भोसले म्हणाले की, कारखान्याची गेल्या गळीत हंगामाची सांगता २२ मार्च रोजी झाली. हंगामाची सांगता झाल्यानंतरअवघ्या ५ दिवसांतच ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपीची सर्व रक्कम अदा करण्यात आली होती. गेल्या गळीत हंगामाची एफआरपी २९४० रुपये प्रती टन होती. कारखान्याने शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून, एफआरपीपेक्षा जादा रक्कम म्हणजेच प्रती टन २९५१ रुपयांचे पहिले ऊस बिल अदा केले. आता ५० रुपयांचे अंतिम ऊस बिल दिले जात आहे. २७ ऑक्टोबरला ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग होईल. जयवंत शुगर्सचे चेअरमन चंद्रकांत देसाई व त्यांच्या पत्नी चंद्रशिला यांच्या हस्ते सत्यनारायण पूजा करण्यात आली. त्यानंतर वजन काटा व गव्हाणपूजन करण्यात आले.