अमेझॉन कंपनीचे सीईओ जेफ बेजोस यांनी पुन्हा एकदा जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींच्या यादीत पहिला क्रमांकावर स्थान मिळवले आहे. त्यांनी टेस्लाचे सीईओ अॅलन मस्क यांना मागे टाकले आहे. मंगळवारी टेस्ला इंसच्या शेअर्समध्ये झालेल्या घसरणीनंतर मस्क हे श्रीमंतांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर राहिले. जेफ बेजोस यांच्या एकूण संपत्तीचा विचार केला तर ब्लूमबर्ग बिलिनिअर इंडेक्सनुसार ती सुमारे १४.१० लाख कोटी इतकी आहे.
यावर्षी, म्हणजेच २०२१ मध्ये टेस्लाचे सीईओ अॅलन मस्क यांची संपत्ती वाढून २०५० कोटी डॉलर इतकी झाली आहे. तर जेफ बेजोस यांच्या संपत्तीत ८८.४० कोटी डॉलर्सची वाढ झाली आहे. तर गेल्या चोवीस तासांमध्ये मस्क यांच्या संपत्तीत ४५८ कोटी डॉलर्सची घट झाली आहे. आणि त्यामुळेच जगातील सर्वोच्च श्रीमंत व्यक्तींच्या यादीतील त्यांचा क्रमांक घसरला आहे. २६ जानेवारीनंतर टेस्लाचे शेअर्स दहा टक्क्यांहून अधिक खालावले आहेत.
मंगळवारी टेस्ला कंपनीचे शेअर्स २.४ टक्क्यांनी खालावून ७९६.२२ डॉलर्सवर आले. त्यामुळे मस्क यांच्या संपत्तीत ४.५८ अब्ज डॉलर्सची घसरण पहायला मिळाली. त्यानंतर अॅलन मस्क यांची एकूण संपत्ती १९००० कोटी डॉलर्सवर आली. मात्र, मस्क हे बेजोस यांच्यापेक्षा फार पिछाडीवर नाहीत.
वस्तूतः गेली अनेक वर्षे जेफ बेजोस हे सातत्याने जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचा किताब पटकावत आहेत. जानेवारी २०२१ मध्ये मस्क यांनी त्यांना मागे टाकून पहिले स्थान पटकावले होते. जेफ बेजोस यांची संपत्ती अॅलन मस्क यांच्यापेक्षा ९५.५ कोटी डॉलर अधिक आहे. तर भारतातील सर्वाधिक श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांचा जगातील टॉप १० श्रीमंतांच्या यादीत समावेश नाही.