जिओच्या ग्राहकांना मोफत फोनवर बोलण्याचा आनंद आता जास्त काळ घेता येणार नाही. कारण, कॉल टर्मिनेशन चार्जच्या नियमातील अनिश्चिततेमुळे व्हॉईस कॉलसाठी शुल्क आकारणार असल्याचं जिओने जाहीर केलंय. जिओ टू जिओ कॉलिंग मोफत असेल. मात्र इतर नेटवर्कवर कॉलिंगसाठी प्रति मिनिट 6 पैसे शुल्क आकारलं जाईल. मात्र ग्राहकांना या बरोबरीत डेटा देऊन समतोल साधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
दूरसंचार कंपन्यांना आपल्या ग्राहकाने इतर नेटवर्कवर फोन केल्यानंतर द्यावं लागणारं शुल्क जोपर्यंत कायम आहे, तोपर्यंत जिओकडूनही 6 पैसे प्रति मिनिट दराने शुल्क आकारलं जाईल, असं कंपनीने स्पष्ट केलंय. हा चार्ज जिओच्या ग्राहकाने इतर नेटवर्कवर फोन केल्यास लागू असेल. मात्र जिओवर येणार्या कॉलिंगसाठी कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजेच ट्रायने 2017 मध्ये इंटरकनेक्ट युजेज चार्ज कमी करुन 14 पैशांहून 6 पैसे प्रति मिनिट केला. जानेवारी 2020 पर्यंत हे शुल्क बंद करणार असल्याचंही सांगितलं होतं. ट्रायने आता याच्या समीक्षेसाठी कन्सल्टेसन पेपर जारी केलाय. जानेवारी 2020 ही मुदत वाढवण्याची गरज आहे का? याबाबत मत मागितलं आहे.
जिओची व्हॉईस कॉलिंग सध्या पूर्णपणे मोफत आहे. त्यामुळे जिओला एअरटेल, व्होडाफोन आणि आयडिया या कंपन्यांना केलेल्या कॉल्ससाठी 13500 कोटी रुपये भरावे लागतात. इनकमिंग मोफत, अतिरिक्त डेटा मिळणार जिओच्या ग्राहकांना इतर नेटवर्कवर कॉल करण्यासाठी शुल्क आकारलं जाणार आहे. पण इनकमिंग मात्र मोफत असेल. त्या मोबदल्यात कंपनी ग्राहकांना अतिरिक्त डेटा देणार आहे. ट्रायच्या कन्सल्टेशन पेपरमुळे निर्णयाबाबतचं चित्र सध्या अस्पष्ट आहे. त्यामुळे जिओला नाईलाजाने ग्राहकांना चार्ज आकारावा लागतोय.
बुधवारपासून केल्या जाणार्या सर्व रिचार्जवर इतर नेटवर्कवर केल्या जाणार्या कॉलसाठी आययूसी टॉपअप व्हाऊचरच्या माध्यमातून 6 पैसे प्रति मिनिट शुल्क आकारलं जाईल. ट्रायकडून टर्मिनेशन चार्ज शून्य केला जात नाही तोपर्यंत जिओच्या ग्राहकांना कॉलिंगसाठी पैसे मोजावे लागतील. या पैशांच्या मोबदल्यात ग्राहकाला आययूसी टॉपअप व्हाऊचरच्या वापरानुसार डेटा दिला जाईल. आययूसी फी म्हणून जिओने गेल्या तीन वर्षात आयडिया, व्होडाफोन आणि एअरटेल यांसारख्या कंपन्यांना 13500 कोटी रुपये दिले असल्याचंही कंपनीने सांगितलंय.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.