कोल्हापूर : येथील श्री दूधगंगा-वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सत्ताधारी महालक्ष्मी शेतकरी विकास आघाडीचे सर्व २५ उमेदवार विजयी झाले आहेत. या नूतन संचालक मंडळाची अध्यक्ष व उपाध्यक्ष निवड शुक्रवार, दि. १५ डिसेंबर रोजी कारखाना प्रधान कार्यालयात होणार आहे. सलग चार वेळा अध्यक्षपद भूषवणारे के. पी. पाटील यांचीच अध्यक्षपदी निवड होणार हे निश्चित आहे, तर उपाध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याबाबत उत्सुकता आहे. उपाध्यक्षपदासाठी संचालक प्रवीणसिंह पाटील, गणतपराव फराकटे किंवा उमेश भोईटे यापैकी एकाची वर्णी लागू शकते.
नुकत्याच झालेल्या निवडणुकीत विजयी झालेल्या नवीन संचालक मंडळाची पहिली बैठक १५ डिसेंबर रोजी होत आहे. यामध्ये अध्यक्ष व उपाध्यक्ष निवड केली जाणार आहे. अध्यक्षपद के. पी. पाटील यांच्याकडे राहणार आहे, तर उपाध्यक्षपदी मंत्री हसन मुश्रीफ गटाचे खंदे समर्थक व एकवेळा उपाध्यक्षपदाची धुरा सांभाळलेले प्रवीणसिंह पाटील यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. मुरगूड परिसरात राष्ट्रवादी पक्षाची विस्कटलेली घडी बसवण्यासाठी व आगामी नगरपालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या गळ्यात उपाध्यक्षपदाची माळ पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.