कोल्हापूर : नवी दिल्लीतील राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ या शिखर संस्थेमार्फत येथील श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्यास गळीत हंगाम २०२२-२३ साठीचा देश पातळीवरील ‘अतिउत्कृष्ट साखर कारखाना’ हा पुरस्कार जाहीर झाला आहे. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील व व्यस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी या पुरस्काराची घोषणा केली. याचे वितरण ऑगस्ट महिन्यात नवी दिल्ली येथे होणार आहे. शाहू कारखान्यास मिळालेला हा ७० वा पुरस्कार आहे. पुरस्कारामुळे शाहू साखर कारखान्याच्या सभासद, शेतकरी, अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
याबाबत ‘चीनी मंडी’शी बोलताना शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे म्हणाले की, हा पुरस्कार म्हणजे कारखान्याचे संस्थापक स्व. विक्रमसिंह घाटगे यांनी कारखाना चालवण्यासाठी घालून दिलेली मार्गदर्शक तत्त्वे, अध्यक्षा सुहासिनीदेवी घाटगे यांचे मार्गदर्शन, सभासद, शेतकऱ्यांनी विश्वासाने दिलेली साथ, व्यवस्थापन नियोजनास अधिकारी-कर्मचारी यांच्या कष्टाची जोड याचे फलित आहे. राजर्षी शाहू महाराजांची स्मृती शताब्दी व विक्रमसिंह घाटगे अमृत महोत्सवी जयंती वर्षात कारखान्याचा हा गौरव म्हणजे त्यांना अभिवादन आहे. तर कारखान्याच्या अध्यक्षा सुहासिनीदेवी घाटगे म्हणाल्या की, सभासद शेतकऱ्यांनी आणि अधिकारी, कर्मचारी पुरवठादार या सर्वांच्या कष्टामुळे हे यश मिळाले आहे. राष्ट्रीय पातळीवरील हा सन्मान आम्हाला विश्वासाने साथ देणाऱ्या सभासद शेतकऱ्यांचा सन्मान आहे.