कोल्हापूर : गळीत हंगाम २०२२-२३ मध्ये देशातून सर्वाधिक साखर निर्यात केल्याबद्दल येथील कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी साखर कारखान्याला नवी दिल्लीतील नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑप. शुगर फॅक्टरीज (NFCSF) तर्फे प्रथम क्रमांकाचा पुरस्कार देण्यात आला. संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कारखान्याने कारखान्याने सन २०२२-२३ या हंगामात एकूण १.१५ लाख मे.टन साखरेची निर्यात करून हा पुरस्कार पटकावला आहे.
केंद्रीय सहकार राज्यमंत्री कृष्णपाल, उत्तर प्रदेशचे ऊस आणि साखर विकासमंत्री लक्ष्मीनारायण चौधरी यांच्या हस्ते आणि नॅशनल फेडरेशनचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्या उपस्थितीत आवाडे जवाहर साखर कारखान्याला समारंभपूर्वक हा पुरस्कार देण्यात आला. पुरस्कार वितरण समारंभास ज्येष्ठ संचालक, आमदार प्रकाश आवाडे, व्हा. चेअरमन बाबासो चौगुले, डॉ. राहुल आवाडे आणि कार्यकारी संचालक मनोहर जोशी उपस्थित होते.
नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑप. शुगर फॅक्टरीज (NFCSF) तर्फे गुणवत्ता पारितोषिक वितरण कार्यक्रम १० ऑगस्टला नवी दिल्ली येथे पार पडला. यात विविध प्रकारांमध्ये देशातील २१ साखर कारखान्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.त्यामध्ये सर्वाधिक १० पुरस्कार महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना मिळाले.देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखान्याला दिला जाणारा वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना पुरस्कार पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याला मिळाला आहे.पुरस्कार वितरण सोहळा दिल्लीतील डॉ.आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर येथे झाला.