श्रीगंगानगर : कमीनपुरा येथील साखर कारखान्याने १२.०४ लाख क्विंटल उसाचे गाळप करून मंगळवारी आपला गाळप हंगाम संपुष्टात आणला. या हंगामात उसाच्या रसाचा गोडवा कमी असल्याने साखर उतारा ७.२७ टक्के आला आहे. गेल्यावर्षी कारखान्याने १०.८३ लाख क्विंटल गाळप केले होते. आणि साखर उतारा ८.०३ टक्के इतका होता. यावर्षी १.२२ लाख क्विंटल जादा उसाचे गाळप झाले आहे.
कारखान्याने या हंगामात कोणत्याही अडथळ्याशिवाय ८७ दिवसात १२,०४,०८६.८२ क्विंटल उसाचे गाळप केले. १५ मार्चपर्यंत १७१३५० पोती साखर उत्पादन झाले आहे. कारखान्याचा साखर उतारा गेल्या पाच वर्षात सर्वात कमी झाला आहे. पहिल्या वर्षी, २०१५-१६ मध्ये उतारा ५.८८ टक्के होता. त्यानंतर २०१६-१७ मध्ये उतारा ८.५५ टक्के, २०१७-१८ मध्ये उतारा ९.०२ टक्के, २०१८०१९ मध्ये उतारा ९.०६ टक्के तर २०१९-२० मध्ये उतारा ८.०३ टक्के इतका होता. मात्र, यावेळी उतारा ७.२७ टक्क्यांपर्यंतच पोहोचला. उसातील रोगाचा फटका बसल्याचे सांगितले जात आहे.
कारखान्याने यावर्षी शेतकऱ्यांनाही दिलासा दिला. दर १५ दिवसांनी शेतकऱ्यांना ऊस बिले अदा करण्यात आली. मात्र, यावर्षी उसाच्या दरात वाढ न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी होती. कारखान्याने पूर्वहंगामी ऊस ३१० रुपये, हंगामी ऊस ३०० रुपये आणि आडसाली ऊस २९५ रुपये प्रति क्विंटल दराने घेतला. शेतकऱ्यांना यावर्षी तोडणीसाठी गेल्यावर्षीच्या तुलनेत १५ टक्के जादा द्यावे लागले. यावर्षी कारखान्यात विजेच्या निर्मितीसह डिस्टिलरी तसेच बायो कम्पोस्टचेही अधिक उत्पादन झाले आहे. कारखान्याने १२.०४ लाख क्विंटलचे गाळप केले असून ७.२७ टक्के इतका उतारा असल्याचे आणि निर्बंध असूनही कारखान्याने सर्वाधिक ऊस गाळप केल्याचे ऊस विकास अधिकारी रजनीश कुमार यांनी सांगितले. तेल्या रोगामुळे उसातील गोडवी कमी झाला. मात्र, कारखाना प्रशासनाच्या प्रयत्नांमुळे हंगाम सुरळीत चालल्याचे ऊस उत्पादक संघाचे सतविंद्र सिंह यांनी सांगितले.