पुणे : माळेगाव सहकारी साखर कारखान्याने या गाळप हंगामात एकूण १३ लाख २७ हजार टन उसाचे गाळप केले. यामध्ये सभासदांचा ७ लाख ९८ हजार टन तर गेटकेनचा ५ लाख २९ हजार टन उसाचा समावेश आहे. गाळप हंगाम २०२३ – २४ मध्ये तुटून आलेल्या सभासदांच्या उसाला प्रती टन २०० रुपये कांडे पेमेंट देण्यात येणार आहे. शुक्रवारी संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष ॲड. केशवराव जगताप यांनी दिली. यावेळी उपाध्यक्ष तानाजीराव देवकाते, सर्व संचालक, कार्यकारी संचालक अशोक पाटील आदी उपस्थित होते.
माळेगाव सहकारी साखर कारखान्याने यापूर्वी या गाळप हंगामात उसाला प्रती टन ३००० रुपये दिले आहेत. कांडे पेमेंटच्या माध्यमातून सभासदांना जादा २०० रुपये प्रती टन मिळणार आहेत. जूनच्या दुसऱ्या आठवड्यात सदरचे पेमेंट मिळण्याची शक्यता आहे. कारखान्याने कांडे बिल देण्याच्या जाहीर केलेल्या निर्णयाबद्दल स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे बारामती तालुकाध्यक्ष विलास सस्ते आदींसह सभासदांनी समाधान व्यक्त केले.