मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कंपनीने खरेदी केलेला कन्नड साखर कारखाना ईडीकडून जप्त करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. या कारवाईमुळे महाराष्ट्राच्या राजकारण आणखीनच तापण्याची शक्यता आहे. सध्या भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आमने-सामने आलेले आहेत. आ. रोहित पवार पक्षवाढीसाठी प्रयत्न करीत असून भाजपा नेत्यांसोबत त्यांचे जोरदार आरोप –प्रत्यारोप होत आहेत. काही दिवसांपूर्वी ईडीने याप्रकरणी आ. पवार यांची चौकशी केली होती.
आता आ. रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कंपनीने खरेदी केलेल्या कन्नड सहकारी साखर कारखान्यावर ईडीने जप्तीची कारवाई केली आहे. शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. ईडीने जप्त केलेल्या कन्नड सहकारी साखर कारखान्याची किंमत ही सुमारे ५० कोटी २० लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणामध्ये ईडीने सुमारे १६१ एकर जमीनही जप्त केली आहे. बारामती अॅग्रोकडून हा कारखाना खरेदी होत असताना शिखर बँकेने जी प्रक्रिया अवलंबली ती चुकीची असल्याचा ठपका ईडीने ठेवला आहे.