कराड : सह्याद्री कारखाना निवडणुकीसाठी उदंड झाले इच्छूक, उमेदवारीसाठी नेत्यांचे कसब पणाला लागणार

कराड : सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे. उमेदवारी अर्ज माघारीची मुदत तीनच दिवसांवर आली आहे. कारखान्याच्या इतिहासात पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे नेत्यांपुढे उमेदवारी कोणाला द्यायची याचा पेच निर्माण झाला आहे. उमेदवारी डावललेला उमेदवार दुसरीकडे जाऊन हातमिळवणी करण्याची भीती असल्याने नेत्यांनी सावध पवित्रा घेतला आहे. सातारा जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात महत्त्वाच्या ठरणाऱ्या या कारखान्याच्या निवडणुकीसाठी उमेदवार ठरवताना नेत्यांचे कसब पणाला लागणार आहे.

माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सह्याद्री कारखाना राज्यात उसाला सर्वाधिक दर देणारा म्हणून नावारूपास आणला. मात्र मध्यंतरीच्या विधानसभा निवडणुकीत कऱ्हाड उत्तर विधानसभा मतदार संघातून भाजपचे मनोज घोरपडे यांनी बाळासाहेब पाटील यांचा पराभव केला. यानंतर लगेच आमदार घोरपडे यांनी सह्याद्री कारखान्याच्या निवडणुकीसाठी रणशिंग फुंकले होते. आमदार घोरपडे यांना भाजपच्या पक्ष नेतृत्वानेही बळ दिले आहे. घोरपडे गटाने काहीही करून सह्याद्री कारखान्याची सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. तर माजी सहकारमंत्री पाटील यांनीही कारखान्यातील सत्ता कायम राहावी यासाठी व्यूहरचना आखली आहे. पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज दाखल आहेत. त्यामुळे नेत्यांपुढेही उमेदवारी कोणाला द्यायची याचा पेच आहे. सत्ताधारी आणि विरोधी गटासाठी ही प्रतिष्ठेची लढाई आहे. त्यामुळे दोन्ही गटांच्या प्रमुखांनी उत्पादक गटातील इच्छुकांनी चर्चा करून उमेदवारांची नावे अंतिम करून कळवावी असा पवित्रा घेतला आहे.

साखर उद्योगाशी संबंधित चालू घडामोडी आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी वाचत रहा चिनीमंडी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here