नेर्ले : चालू गळीत हंगामात १२ लाख ३९ हजार मे. टन उसाचे यशस्वी गाळप करून शिवनगर येथील य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या ६५ व्या गळीत हंगामाची उत्साहात सांगता झाली. चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्यासह संचालक मंडळाच्या उपस्थितीत कारखाना कार्यस्थळावर कारखान्याचा २०२४-२५ च्या गळीत हंगामाचा सांगता सोहळा झाला. यावेळी चेअरमन डॉ. सुरेश भोसले म्हणाले, संचालक मंडळ, शेतकरी, सभासद, तोडणी वाहतूकदार, कंत्राटदार, अधिकारी व कर्मचारी यांच्या सहकार्याने हा गळीत हंगाम यशस्वीपणे पार पडला. कमी वेळेत जास्त गाळप केले आहे. कारखान्याला ऊस पुरवठा करण्यास शेतकऱ्यांचे प्राधान्य राहिले, ही चांगल्या कामाची पोचपावती आहे.
सहकारी साखर कारखान्यांमध्ये कृष्णा कारखान्याने दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक गाळप केले आहे. साखर उतारा चांगला आहे याबद्दल चेअरमन भोसले यांनी आनंद व्यक्त केला. व्हाइस चेअरमन जगदीश जगताप, संचालक बाजीराव निकम, शिवाजी पाटील, जे. डी. मोरे, विलास भंडारे, अविनाश खरात, धोंडीराम जाधव, प्रभारी कार्यकारी संचालक पंडित पाटील, मनोज पाटील, जनरल मॅनेजर टेक्निकल बालाजी पबसेटवार, जनरल मॅनेजर केन दादासाहेब शेळके, वाळवा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आबासाहेब पाटील, कोरेगावचे सरपंच बाळासाहेब पाटील, प्राचार्य डॉ. अशोक फरांदे व मान्यवर उपस्थित होते.