अहिल्यानगर : कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचा भविष्यात बाजारात आपल्या साखरेचा ब्रॅण्ड तयार करण्याचा मानस असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी जाहीर केले. कारखान्याच्या ६९ व्या विक्रमी गळीत हंगामाचा सांगता समारंभ कारखान्याचे मार्गदर्शक व ज्येष्ठ संचालक माजी आमदार अशोकराव काळे यांच्या अध्यक्षतेखाली झाला. शुक्रवारी, दि. १९ रोजी कारखान्याचे उपाध्यक्ष डॉ. मच्छिंद्र बर्डे व त्यांच्या पत्नी चित्राताई बर्डे यांच्या हस्ते पूजा झाली.
आमदार काळे म्हणाले की, साखर उद्योगाला आर्थिक स्थैर्य येण्यासाठी केंद्र शासनाने साखर धोरणांमध्ये सातत्य ठेवणे आवश्यक आहे. कारखान्याने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन दोन टप्प्यामध्ये आधुनिकीकरण व विस्तारीकरण केले आहे. गाळप क्षमता प्रती दिन ६००० मे.टन झाली आहे. १६७ दिवसांत कारखान्याने ८,४५,७३४ मे. टन ऊस गाळप करून चांगला साखर उताराही मिळवला आहे असे ते म्हणाले. यावेळी उपाध्यक्ष डॉ.मच्छिंद्र बर्डे, संचालक सुधाकर रोहोम, दिलीपराव बोरनारे, राजेंद्र घुमरे, सचिन चांदगुडे, सूर्यभान कोळपे, श्रीराम राजेभोसले, राहुल रोहमारे, प्रवीण शिंदे, शंकरराव चव्हाण, अनिल कदम, अशोक मवाळ, सुनील मांजरे, मनोज जगझाप, वसंतराव आभाळे, दिनार कुदळे, सुरेश जाधव, विष्णू शिंदे, श्रावण आसने आदी उपस्थित होते. अरुण चंद्रे यांनी सूत्रसंचालन केले. संचालक सचिन चांदगुडे यांनी आभार मानले.