जालना : कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखान्याच्या युनिट एक आणि दोनमध्ये १८ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. दररोज समर्थ युनिटमधून दहा हजार मेट्रिक टन उसाचे व सागर युनिटमधून चार हजार मेट्रिक टन उसाचे असे एकूण १४ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप होईल. याबरोबर इथेनॉल व वीजनिर्मितीही सुरू केली जाईल. कारखान्याचे गाळप एप्रिल अखेरपर्यंत होईल, अशी माहिती माजी मंत्री राजेश टोपे यांनी दिली. अंकुशनगर येथे कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ कारखान्याच्या गळीत हंगाम प्रारंभ प्रसंगी ते बोलत होते.
माजी मंत्री राजेश टोपे संचालक मंडळ व शेतकऱ्यांच्या हस्ते गव्हाणीत मोळी टाकून गव्हाणीचे व वजन काट्याचे पूजन करण्यात आले. टोपे म्हणाले की, यावर्षी दोन्ही कारखान्यास उसाची कमतरता नसून सर्व शेतकऱ्यांच्या उसाचे गाळप होईल. त्यासाठी लागणारी ऊसतोड वाहतूक, ट्रक, ट्रॅक्टर बैलगाडी, ही यंत्रणा सज्ज आहे. शेतकऱ्यांच्या उसाची तोडणी वाहतूक ही दिलेल्या कार्यक्रमानुसार होईल. त्यामध्ये कोठेही बदल केला जाणार नाही काळजी शेतकी खात्याने घेण्याची गरज आहे. यावेळी संचालक, कार्यकारी संचालक, अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.