राज्यातील बहुचर्चितसहकारी साखर कारखान्यांच्या कार्यकारी संचालक पद परीक्षेचा निकाल अखेर 10 फेब्रुवारी 2025 ला राज्य साखर आयुक्तांनी जाहीर केला. लेखी परीक्षेला बसलेल्या 325 उमेदवारांपैकी 73 उमेदवार अंतिम तोंडी परीक्षेत यशस्वी झाले. त्यातील अव्वल 50 उमेदवार सहकारी साखर कारखाना एमडी पॅनेलसाठी पात्र ठरले. 2022 मध्ये सुरू झालेली परीक्षा प्रक्रिया अखेर 2025 मध्ये पूर्ण झाली. या परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर जशी उत्तीर्ण उमेदवारांची चर्चा सुरु झाली, तशी आणखी एका व्यक्तीची राज्याच्या साखर उद्योगात जोरदार चर्चा सुरु झाली…ती व्यक्ती म्हणजे ज्येष्ठ साखर उद्योग अभ्यासक पी.जी. मेढे यांची. राज्यात सहकारी साखर कारखान्यांच्या कार्यकारी संचालक(एमडी)पॅनल परीक्षेत पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विश्वजित शिंदे यांच्यापासून सागर पाटील (भोगावती) यांच्यापर्यंत अनेकांना मेढे यांनी समर्पित भावनेने केलेल्या बहुमोल मार्गदर्शनाचा फायदा झाला. यशस्वी उमेदवारांनीही मेढे यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करत त्यांना यशाचे श्रेय दिले.
साखर उद्योगाच्या विकासासाठी समर्पित भावनेने काम करणारा कर्मयोगी म्हणून पी पी.जी. मेढे यांना ओळखले जाते. साखर उद्योगातील कुठलीही माहिती, सरकारी निर्णय, ध्येय- धोरणांचे परिणाम, स्थानिक पातळीपासून आंतरराष्ट्रीय पातळीवरील साखर उद्योगाशी संबधित कुठलीही माहिती जाणून घ्यायची असल्यास प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल माध्यमात काम करणाऱ्या देश- विदेशातील पत्रकारांचा हक्काचा ‘न्यूज सोर्स’ म्हणजे पी.जी.मेढे सर. रात्री- अपरात्री कधीही संपर्क केला तरी मेढे सर अगदी न थकता माहिती देत असतात. त्यांच्याशी बोलताना साखर उद्योगाच्या विकासाबाबत त्यांची असणारी तळमळ दिसून येते. पत्रकार, साखर कारखानदार, साखर उद्योगाचे अभ्यासक अशा सर्वाना पी.जी. मेढे सदैव उपलब्ध असतात.
पी.जी. मेढे यांनी कोल्हापूरमधील भोगावती, कुंभी-कासारी आणि छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना यासह अनेक सहकारी साखर कारखान्यांचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून आपल्या कामाची छाप सोडली आहे. १९८० पासून त्यांनी आपले जीवन साखर उद्योगासाठी समर्पित केले. वयाची ७५ ओलांडली तरी त्यांचे काम आजही अव्याहतपणे सुरूच आहे. त्यांनी कित्येक संस्थांमध्ये मानधन न घेता केवळ साखर उद्योगाच्या भल्यासाठी पूर्णवेळ मानद तज्ञ सल्लागार म्हणून काम केले आहे.
सहकारी साखर क्षेत्रासाठी अत्यंत प्रतिभावान एमडींना घडवण्याच्या उद्देशाने सामाजिक सेवा म्हणून त्यांनी ऑफलाइन आणि ऑनलाइन कोचिंग वर्ग आयोजित केले होते. त्यांनी प्रशासन, वित्त, कृषी, अभियांत्रिकी, उत्पादन, नागरी, भांडार आणि खरेदी, देखरेख आणि वॉर्ड, गाळप, पर्यावरण/ईटीपी, विपणन, कायदेशीर, मानव संसाधन, वेळ कार्यालय, वाहन आणि कामगार यासह साखर कारखान्यांच्या प्रत्येक विभागाची माहिती परीक्षार्थीना दिली. त्याचबरोबर साखर उद्योगाशी संबंधित कायदे, नियम, सरकारी साखर धोरणे, आंतरराष्ट्रीय साखर परिस्थिती, सामान्य ज्ञान राज्य आणि केंद्र सरकारी कार्यालये आणि साखर महासंघ याबब्र सखोल मार्गदर्शन केले.
एमडी परीक्षेत पहिले आलेले विश्वजित शिंदे म्हणाले की, पी.जी. मेढे यांनी सतत पाठपुरावा करत माझ्याकडून एमडी परीक्षेची तयारी करून घेतली. अर्ज भरल्यापासून ते सातत्याने तयारी करवून घेत होते. अगदी विद्यार्थ्यांना क्लासमध्ये समजावून सांगावे, नोट्स काढून द्याव्यात, तसे ते मार्गदर्शन करत. त्यांनी यासाठी ऑनलाइन क्लासही घेतले. स्वत: नोट्स तयार करून सर्वांना पाठवत असत. आज एमडी पॅनलमध्ये निवड झालेले सर्व ५० उमेदवार मेढे सरांचे विद्यार्थी आहेत हे मी अभिमानाने नमूद करतो.विश्वजित शिंदे सध्या श्री दत्त साखर कारखान्यामध्ये प्रॉडक्शन मॅनेजर पदावर कार्यरत आहेत.