बेंगळुरू : राज्य सरकारने चिंचोली येथील साखर कारखान्याला परवानगी न दिल्यास १७ सप्टेंबर रोजी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीवेळी आंदोलन केले जाईल, असा इशारा जिल्हा भाजप नेत्यांनी दिली आहे. डेक्कन हेराल्डने याबाबतचे वृत्त दिले आहे. मंगळवारी संयुक्त पत्रकार परिषदेत भाजप नेत्यांनी सांगितले की, सरकार पक्षाचे आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांना लक्ष्य करून राजकारण करत आहे. यत्नाळ हे चिचोंली साखर कारखाना चालवणाऱ्या सिद्धसिरी सौहर्दा सहकारी रेग्युलरचे (एसएसएसएन) अध्यक्ष आहेत.
याबाबत, मीडिया रिपोर्ट्सनुसार, या कारखान्याने पर्यावरण नियमांचे पालन न केल्याचा आरोप आहे, त्यामुळे कर्नाटक राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने (KSPCB) कारखाना बंद करण्याचे आदेश दिले आहेत. १५ सप्टेंबरपूर्वी कारखान्याला ऊस गाळपास परवानगी न दिल्यास पक्ष आंदोलन करेल, असे भाजप नेते राजकुमार पाटील तेलकूर यांनी सांगितले. सरकारने पर्यावरण आणि आरोग्याला धोका निर्माण करणाऱ्या सिमेंट कारखान्यांमधून निघणाऱ्या धुळीवर कारवाई केली नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
तेलकूर म्हणाले की, कारखाना कार्यक्षेत्रातील चार तालुक्यांतील एक लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावर उसाची लागवड केली जाते. कारखाना शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. यातून सुमारे १०,००० लोकांना रोजगार मिळतो. जिल्ह्याचे प्रभारी मंत्री प्रियांक खारगे हे केवळ चिंचोली साखर कारखान्याबाबत बोलत आहेत. अनेक सिमेंट कारखानेही पर्यावरणाच्या निकषांचे उल्लंघन करतात. त्यांच्याकडे दुर्लक्ष केले गेले. पर्यावरणविषयक समस्या सोडवण्यासाठी कारखाना बंद करण्यापेक्षा त्यांच्या चुका सुधारल्या पाहिजेत.