मंड्या : चामुंडेश्वरी शुगर्स (चामशुगर) ने गुरुवारी ऊस गाळपाला सुरुवात केली. त्यामुळे हजारो ऊस उत्पादक शेतकरी आणि अधिकाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. कारखान्याने यावर्षी कमीत कमी १० लाख टन ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. गेल्यावर्षी कंपनीने एकूण १०.३५ लाख टन उसाचे गाळप करुन उच्चांक प्रस्थापित केला होता. आणि गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी गळीत हंगाम दोन महिने आधीच सुरू झाला आहे. गेल्यावर्षी ही प्रक्रिया ऑगस्टमध्ये सुरू झाली होती.
यावर्षी मंड्या जिल्ह्यात पाऊस कमी असल्याने उत्पादनावरही परिणाम झाला आहे. असे असले तरी साखर कारखान्यांना ऊस कमी पडणार नाही, असे म्हटले जात आहे. जिल्ह्यात ऊस बिलांची थकबाकी ही एक मोठी समस्या आहे. आणि शेतकरी थकीत पैशांची मागणी करीत आहेत. सरकारी मालकीचा आजारी साखर कारखाना, मायशुगर (म्हैसूर शुगर कंपनी लिमिटेड) च्या कामकाजाबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे.
द टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, चामुंडेश्वरी शुगरचे महाव्यवस्थापक (इंजिनीअरिंग) एम. रवी यांनी सांगितले की, व्यवस्थापनाने या वर्षी १२ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत जिल्ह्यात पुरेसा पाऊस न झाल्याने उत्पादन कमी आहे. ते म्हणाले की, त्यामुळे हे उद्दिष्ट गाठणे अवघड आहे. मात्र, आम्ही कमीत कमी १० लाख टन ऊस गाळप करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.