बेंगलोर : गेल्या वर्षी उच्चांकी उत्पादनानंतर कर्नाटकमधील शेतकऱ्यांना कोरोनाच्या संकटामुळे शेती आणि त्यासंबंधीच्या कामांवर परिणाम होण्याची भीती सतावत आहे. गेल्यावर्षी कोरोना महामारी असतानाही राज्यात १५३ लाख मेट्रिक टन धान्य उत्पादनाचे आजवरचा उच्चांक प्रस्थापित करण्यात आला. मात्र, यावेळी कोरोना महामारी गतीने शहरांसह ग्रामीण भागात फैलावत आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसह कमी वयाच्या शेतकऱ्यांनाही महामारीचा फटका बसत आहे. त्यामुळे स्थानिक आरोग्य सेवा आणि शेतीवर दबाव वाढला आहे.
प्रसार माध्यमांतील वृत्तानुसार, कर्नाटक राज्य ऊस उत्पादक संघाचे अध्यक्ष कुरुबुर शांताकुमार यांनी अनेक जिल्ह्यांत पोलिस शेतकऱ्यांना शेतात जाऊ देत नसल्याचा आरोप केला होता. अनेक ठिकाणी पोलिस शेतकऱ्यांची औजारे जप्त करीत आहेत. दरम्यान, कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, जर स्थिती वाढली आणि कोरोनाचा फैलाव शेतकऱ्यांमध्ये झाला तर त्याचा उन्हाळी पिके आणि खरीप हवामानाचा प्रतिकूल परिणाम होईल. ही स्थिती लवकरच बदलेल अशी अपेक्षा आहे. मात्र, जर दुसरी लाट मे महिन्याच्या पुढे गेली तर नुकसान अधिक वाढू शकते.