म्हैसूर : कोरोना महामारीच्या प्रकोपामुळे शेतीकामांना मोठ्या प्रमाणात फटका बसत आहे. ग्रामीण भागात अतिशय वाईट स्थिती असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. शेतकऱ्यांना पेरणी कामासाठी जमीन तयार करण्यापासून ते उन्हाळी पिकांच्या कापणीपर्यंत सर्वच कामांमध्ये कामगारांचा तुटवडा आहे. कर्नाटक ऊस उत्पादक संघाचे अध्यक्ष कुरुबुर शांताकुमार यांनी सांगितले की, गावांमध्ये कोविड १९च्या फैलावामुळे बाहेरील कामगारांना शेतामध्ये घेण्यास शेतकरी अनुत्सुक आहेत.
म्हैसूर मध्ये शेती विभागाचे संयुक्त संचालक महंतेशप्पा यांनी सांगितले की, कोरोनाच्या फैलावामुळे पुढील काही काळ शेतीच्या कामांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. पेरणीसह उन्हाळी कामे तसेच आगामी शेतीकामांसाठी मजुरांची कमतरता भेडसावणार आहे. शेतांमध्ये कामगारांना कामावर ठेवणे ही नेहमीची बाब आहे. मात्र आता कामगार रोजगारासाठी आपले गाव सोडून दुसरीकडे जाण्यास इच्छुक नाहीत. यासोबतच गावात स्थानिक नागरिक कोरोनाच्या भीतीने इतर ठिकाणचे कामगार आल्यास त्यावर आक्षेप घेत आहेत.
शांताकुमार म्हणाले, गावातील लोक आता तपासणी आणि अलगीकरण करण्याऐवजी आपला आजार लपवत आहेत. त्यामुळे परिस्थिती अधिक बिघडत आहे. म्हैसूर जिल्ह्यात गुरुवारी १६,०२६ अॅक्टिव्ह रुग्ण असून त्यापैकी १०,१०४ स्थानिक आहेत तर उर्वरीत अन्य तालुक्यांतील आहेत.