बेळगाव : बेळगाव जिल्ह्यात सध्या ३० कारखान्यांकडून जिल्ह्यात गाळप सुरू आहे. या कारखान्यांकडून एक कोटीहून अधिक टन उसाचे गाळप करण्यात आले आहे. यंदा सर्वच कारखान्यांना ऊस गाळपासाठी ऊस कमी पडण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात रोजी सुमारे दोन लाख टन ऊस गाळप करण्याची क्षमता कारखान्यांची आहे. मात्र पुरेसा ऊस पुरवठा होत नसल्याने गाळप कमी होत आहे. आतापर्यंत एक कोटींवर टन ऊस गाळप झाले आहे. सध्या कर्नाटकातील कारखान्यांनी केलेले गाळप व साखर उतारा पाहिल्यास सर्वच कारखान्यांचा उतारा साडेदहा टक्क्यांहून अधिक आहे. काही कारखान्यांचा उतारा बारा टक्क्यांपर्यंत गेला आहे.
जिल्ह्यात सध्या सर्वाधिक १८ हजार टन या क्षमतेने उगार कारखान्याचा गाळप सुरू आहे. प्रत्यक्षात काही टन ऊस कमी गाळप सुरू आहे. १६ हजारांवर टन रोज ऊस गाळप होत असल्याची आकडेवारी आहे. जिल्ह्यात सर्वाधिक ऊस दर देणाऱ्या बेडकीहाळ येथील व्यंकटेश्वरा कारखान्याची क्षमता १२ हजार टन इतकी असून, त्यांचा हंगाम त्यापेक्षा अधिक गाळपाने सुरू आहे. जिल्ह्यात साधारण १४ कारखान्यांचा हंगाम क्षमतेपेक्षा कमीने सुरू आहे. रायबाग तालुक्यात अळगवाडी येथे मोठा कारखाना सुरू आहे. त्यांची गाळप क्षमता अधिक असली, तरी सध्या दहा हजाराने गाळप सुरू आहे. जिल्ह्यात ८ नोव्हेंबरपासून कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाला आहे. सर्वच कारखान्यांचा गळीत हंगाम ६० दिवसांहून अधिक ओलांडला आहे. सद्यस्थितीत चिक्कोडी विभागातील बहुतांश कारखान्यांचा हंगाम या महिन्याअखेर अथवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात अंतिम टप्प्यात येईल, असे चित्र आहे. महाराष्ट्रातील ऊस गळीत हंगाम उशीरा सुरू झाला. मात्र, नंतर महाराष्ट्रातील बहुतांश कारखान्यांकडून कर्नाटक सीमाभागातील ऊस उचलत असल्याने उसाची पळवापळवी अधिक वाढली आहे. महाराष्ट्रात अधिक दर असल्याने आता शिल्लक ऊस बहुतांश तेथील कारखान्यांना जाणारा असल्याचे दिसून येते.