मुंबई : भारतीय रिझर्व बँकेने कर्नाटकमधील डेक्कन अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडला नवे कर्ज देण्यास अथवा पैसे स्वीकारण्यास मनाई केली आहे. यासोबत ग्राहकांना आपल्या बचत खात्यामध्ये १००० पेक्षा जादा पैसे काढण्यावर निर्बंध घातले आहेत. आगामी सहा महिन्यासाठी हे निर्बंध जारी असतील.
या सहकारी बँकेला पूर्व मंजुरीशिवाय कोणतीही नवी गुंतवणूक अथवा देणी देण्यास मनाई केली आहे. आरबीआयने सांगितले की, बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना याबाबत गुरुवारी, १८ फेब्रुवारी रोजी हे निर्देश दिले आहेत. १९ फेब्रुवारी २०२१ रोजी संध्याकाळपासून सहा महिने हे निर्बंध लागू करतील. त्यानंतरच्या स्थितीवर त्याचा कालावधी अवलंबून असेल.
आरबीआयने एका नोटिफिकेशनमध्ये म्हटले आहे की, बँकेतील सद्यस्थिती पाहता ग्राहकांना आपले बचत खाते अथवा चालू खात्यामधील एक हजाराहून अधिक रक्कम काढण्यास मनाई केली आहे. ग्राहक आपले कर्ज भरण्यासाठी प्रक्रिया करावी लागेल. त्यासाठीही काही अटी लागू केल्या आहेत.
बँकेतील ९९.५८ टक्के ग्राहक वीमा आणि कर्जाच्या निकषात बसणारे आहेत. आरबीआयच्या अनुषंगाने बँकेतील जमा पैशांवर विमा सुविधा मिळेल. निर्बंध म्हणजे बँकेचा परवाना रद्द करण्यात आलेला नाही. बँकेची आर्थिक स्थिती सुधारल्यानंतर पुन्हा कामकाज पूर्ववत केले जाईल.