बेळगाव : कर्नाटकचे साखर आणि कापड मंत्री शंकर बी. पाटील मुनेनकोप्पा यांनी मंगळवारी विधान परिषदेत सांगितले की, चालू विधानसभेच्या सत्र समाप्तीनंतर त्वरीत ऊस विकास आणि साखर संचालनालय बेळगावमध्ये स्थलांतरीत करण्यात येणार आहे.
आमदार शरवना टी. ए. यांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना मंत्री मुनेनकोप्पा यांनी सांगितले की, या प्रदेशाचा सर्वांगीण विकास सुनिश्चित करण्यासाठी अनेक विभाग आणि महामंडळांची कार्यालये उत्तर कर्नाटकात स्थलांतरित करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचा हा एक भाग आहे. याबाबतचा सरकारी आदेश सप्टेंबर २०२१ मध्ये जारी करण्यात आला होता असे त्यांनी सांगितले. या निर्णयामुळे उत्तर कर्नाटकमधील शेतकऱ्यांसह या भागातील साखर कारखान्यांनाही मदत मिळणार आहे. ते म्हणाले की, राज्यातील एकूण ७३ साखर कारखान्यांपैकी ६० कारखाने उत्तर कर्नाटकमध्ये आहेत. एवढेच नाही तर राज्याच्या दक्षिण भागातील ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखान्यांच्या सुविधांसाठी ऊस विकास आणि साखर संचालनालयाचे छोटे कार्यालय बेंगळुरूमध्येही सुरू ठेवले जाईल.