निवडणुकीची रणधुमाळी सुरू असलेल्या कर्नाटक राज्याच्या आपल्या दोन दिवसीय दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी, सोमवारी काँग्रेसचे नेते राहुल गांधी ऊस उत्पादक शेतकरी आणि युवकांसमवेत चर्चा करतील. आणि त्यानंतर राज्यात एका जाहीर सभेत लोकांशी संवाद साधतील.
कर्नाटकमध्ये ऊस उत्पादक शेतकरी ही एक महत्त्वाची व्होटबँक मानली जाते. कारण राज्यातील ऊस शेती देशात तिसऱ्या क्रमांकावर आहे. राज्यातील ऊस उत्पादक शेतकरी नेहमीच निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे राज्यातील प्रत्येक राजकीय पक्षाकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आपल्याकडे ओढण्याचे प्रयत्न केले जातात.
राहुल गांधी दुपारी दोन वाजता बेळगाव जिल्ह्यातील रामदुर्गमध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांशी चर्चा करतील. शेतकऱ्यांशी चर्चा झाल्यानंतर गांधी युवा संसदमध्ये युवकांशी संवाद साधण्यासाठी गदगला रवाना होतील.