बेळगाव : साखर कारखानदारांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची बिले न दिल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. केंद्र सरकारने साखर निर्यात आणि इथेनॉल उत्पादनावर प्रतिबंध घातल्यामुळे कारखान्यांच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. त्यामुळेच कारखाने शेतकऱ्यांना वेळेवर ऊस बिले वेळेवर देऊ शकत नसल्याचे सांगितले जात आहे. गाळप हंगाम संपून काही महिने उलटले आहेत आणि कारखान्यांकडे अद्याप सुमारे 1,500 कोटी रुपयांची थकबाकी आहे. एफआरपीनुसार बेळगावी जिल्ह्यातील २८ पैकी १० साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांची २१६ कोटी रुपयांची उसाची बिले थकीत आहेत.
रास्त आणि मोबदला किंमत (एफआरपी) नियमांनुसार, उसाचा पुरवठा झाल्यापासून 14 दिवसांच्या आत उसाची बिले देणे बंधनकारक आहे. मात्र, अनेक साखर कारखान्यांनी डिसेंबरपासून बिले ठ्क्व्लेली आहेत. काही कारखान्यांकडे तर अद्याप गेल्या वर्षीची उसाची थकबाकी आहे. साखर आयुक्त पी रविकुमार म्हणाले की, केंद्र सरकारने साखर निर्यात आणि इथेनॉल उत्पादनाला प्रतिबंध घातल्याने साखर कारखान्यांसमोरील अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे कारखान्यांना उसाची बिले देण्यास विलंब झाला. सर्व कारखान्यांनी ३१ मे पर्यंत थकीत बिले अदा करणे अपेक्षित आहे.