कर्नाटक : साखर कारखानदारांविरोधात विधानसौधवर मोर्चासाठी शेतकरी बेळगावला रवाना

बेळगाव : शेतकऱ्यांच्या कोणत्याही पिकाला हमीभाव देण्यासाठी सरकार तयार नाही. त्यामुळे शेतकरी देशोधडीला लागला आहे. साखर कारखानदारांनी एफआरपीच्या नावाखाली शेतकऱ्यांची लुबाडणूक चालवली आहे. उसाला कारखान्यांकडून ४ हजार आणि सरकारने २ हजार रुपये दर देणे अपेक्षित असतानाही तीन हजार दर देऊन शेतकऱ्यांची फसवणूक करीत आहेत. शेतकऱ्यांना न्याय न मिळाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा रयत संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष राजू पोवार यांनी दिला.

शेतकऱ्यांच्या विविध समस्यांबाबत संघटनेतर्फे मोर्चा काढून तहसीलदार आणि मंडल पोलिस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले. त्यानंतर हा मोर्चा बेळगावकडे विधानसौधवर निघाला. त्यावेळी पोवार बोलत होते. पोवार म्हणाले, बेळगाव जिल्ह्यातील साखर कारखान्यानी दराची घोषणा न करताच ऊस तोड सुरू केली आहे. जोपर्यंत शेतकरी अन्याय,अत्याचाराविरुद्ध व पिकांना हमीभाव देण्यासाठी रस्त्यावर उतरत नाही, तोपर्यंत शेतकरी वर्गाला न्याय मिळणार नाही. शेतकऱ्यांना १२ तास वीज व कर्जमाफी झाले पाहिजे.

बुलढाणा येथील शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर म्हणाले, साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या उसाला वाढीव दर देऊन त्यांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न करावा. आपला हा लढा शेतकऱ्यांच्या हितासाठी सुरू राहणार असून कर्नाटकातील प्रत्येक आंदोलनात आपण सहभाग घेणार आहोत. मोर्चामध्ये बळीराजा पक्षाचे बाळासाहेब रास्ते, जय शिवराय संघाचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष शिवाजी माने, सदाशिव कुलकर्णी, बाळकृष्ण पाटील, डॉ. सुदर्शन घेरडे, कलगोंडा कोटगे, सर्जेराव हेगडे, एकनाथ सादळकर, दगडू चेंडके, दत्ता लाटकर, संजय पोवार, एम. आय. हवालदार, मयूर पोवार, रमेश पाटील, सदाशिव कुलकर्णी, पवनकुमार पाटील व शेतकरी सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here