बेळगाव : कर्नाटक राज्यात बेळगाव जिल्ह्यात सर्वात जास्त उसाचे उत्पादन होते. उसाचा गाळप हंगाम सुरू होऊन महिना झाला तरी बेळगाव जिल्ह्यातील सहकारी व खासगी साखर कारखान्यांनी अद्याप ऊसदर जाहीर केलेला नाही. ऊसदर जाहीर करण्याबाबत कारखानदारानी ठोस पूल उचललेले नाही. जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांच्या नजर यंदा किती दर मिळणार, याकडे लागल्या आहेत.
बेळगाव हा उसाचा आणि साखर कारखान्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यात उसाचे क्षेत्र राज्यात सर्वाधिक आहे. बेळगाव जिल्ह्यातील साखर कारखाने नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू करण्यात आले. यावर्षी साखर कारखान्यांचा गाळप हंगाम उशिराने सुरू झाला. आता गाळप हंगाम सुरू होऊन महिना झाला आहे. मात्र अद्याप उसाचा दर ठरलेला नाही.
ऊस लागवड करताना शेतकऱ्याला एकरी एक लाख रुपये खर्च येतो. खते, मशागतीचा खर्च, वाढलेली मजुरी यात शेतकरी मेटाकुटीला येतो. कारखानदारांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ३५०० रुपये दराने पहिली उचल द्यायला हवी, अशी मागणी ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून होत आहे. बेळगाव येथे कर्नाटक सरकारचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात ऊस दराची कोंडी फुटणार का, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. ऊस दराच्या कोंडीबाबत शेतकरी नेतेही शांत आहेत.