म्हैसूर : महाराष्ट्राप्रमाणे कर्नाटकमध्येही ऊस दर आंदोलन सुरु आहे. राज्यातील साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रती टन १५० रुपये अतिरिक्त दर द्यावा, अशी मागणी राज्य ऊस उत्पादक संघाचे अध्यक्ष कुरुबुर शांताकुमार यांनी केली. आहे. याबाबत त्यांनी कर्नाटक सरकारला १० दिवसांची मुदत दिली आहे. राज्य सरकारने याबाबत निर्णय घेतला नाही, तर ९ नोव्हेंबर रोजी म्हैसूरमध्ये मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या निवासस्थानासमोर शेतकरी निदर्शने कार्नर असल्याचे त्यांनी पत्रकारांना दिली.
कुरबुर शांताकुमार म्हणाले की, ऊस दरासाठी संघटनेने सातत्याने आंदोलने केली आहेत. तरीही सरकारने या मागणीकडे कानाडोळा केला आहे. सरकारने साखर कारखान्यांना प्रती टन २,८५० रुपये देण्याचे आदेश दिले. गेल्या हंगामातील अतिरिक्त १५० रुपये देण्याची घोषणा केली. मात्र, कारखानदारांनी फक्त २,८५० रुपये दर दिला. वर्षभरानंतरही दीडशे रुपयांचे प्रोत्साहन अनुदान दिलेले नाही. सध्याचा ऊस दर ३१५० रुपये प्रती टन आहे. हा दर ३५८० रुपये करावा अशी आमची मागणी आहे. शांताकुमार म्हणाले, राज्यभरातील २१६ तालुके दुष्काळग्रस्त असल्याचे सरकारने जाहीर केले. मात्र, सरकार दुष्काळ निवारणाच्या उपाययोजना राबवण्यास दिरंगाई करत आहे. सिंचनासाठी दिवसातून १० ऐवजी पाच तास वीज पुरवठा केला जातो. सरकार उद्योगांना २४ तास अखंड वीज पुरवठा करते. मात्र, शेतीला नाही अशी टीका त्यांनी केली.