बेंगळुरू : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी टोयोटाकडून ३३ हायब्रीड हायक्रॉस वाहने खरेदी करण्यास मंजुरी दिली आहे. यासाठी एकूण १० कोटी रुपये खर्च होणार आहेत. फ्लेक्स-इंधन इंजिनसह पुर्णपणे इथेनॉलवर चालणाऱ्या या कारचे हे मॉडेल नुकतेच लाँच करण्यात आले होते. २९ ऑगस्ट रोजी कारचे लाँचिंग झाल्यानंतर सरकारने याबाबतचा आदेश जारी केला आहे.
याबाबतच्या आदेशात म्हटले आहे की, कार्मिक आणि प्रशासनिक सुधारणा विभागाच्या (DPAR) माध्यमातून कर्नाटक सार्वजनिक खरीद पारदर्शकता (KTPP) अधिनियम १९९९ च्या कलम ४G च्या अंतर्गत सवलतीसाठी थेट टोयोटा किर्लोस्कर मोटर कंपनी, बेंगळुरूशी संपर्क साधला जाईल. चांगल्या दर्जाच्या सेवा स्वीकार्य दरात DPAR ला खरेदी करण्याचे अधिकार आहेत. सरकारकडून दरवेळी केटीपीपी कायद्यानुसार, ४G सवलत देण्याची मागणी केली जाते.
टाईम्स ऑफ इंडियामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, नवीन वाहने खरेदी करण्याचा निर्णय काही निकषांवर आधारित आहे. हे वाहन एक लाख किलोमीटर चालले पाहिजे किंवा रस्त्यावर तीन वर्षे पूर्ण चालले पाहिजे, असे निकष आहेत. मंत्र्यांसाठी गेल्या तीन वर्षांपासून एकही वाहन खरेदी करण्यात आलेले नाही. शेवटची वाहन खरेदी २०२० मध्ये माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्या कार्यकाळात करण्यात आली होती. डीपीएआरच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, नवीन सरकार सत्तेवर आल्यावर नवीन वाहने खरेदी करण्याचा निर्णय घेणे ही एक “परंपरा”च आहे.