बेळगाव : ऊस पिकाला गरजेनुसार पाणी देणे गरजेचे आहे. जादा उत्पादन मिळवण्यासाठी पाण्याचे नियोजन अत्यावश्यक आहे, असे प्रतिपादन ‘हालशुगर’चे ऊस विकास अधिकारी विश्वजित पाटील यांनी केले. शेतकऱ्यांनी ऊस पिकावरील पाण्याचा ताण कमी कसा करावा याबाबत हालसिद्धनाथ साखर कारखान्याकडून मार्गदर्शन केले जात आहे. त्याअंतर्गत सभासदांच्या शेतामध्ये भेट देऊन ‘ऊस पिकासाठी पाण्याचे नियोजन’ याबाबत पाटील यांनी मार्गदर्शन केले. ठिबक सिंचनाचा वापर करून पाणी द्यावे. त्यामुळे उन्हाळ्यातील ऊस पिकास पाण्याचा ताण कमी होऊ शकतो, असे त्यांनी सांगितले.
मार्च ते जूनपर्यंत ऊस पिकाला पाण्याची गरज असते. दिवसा व रात्रीच्या तापमानात फरक पडत असतो. लांब सरी, एक आडसरी किंवा जोड ओळ पट्टा पद्धतीचा वापर करून पाणी द्यावे. पाचट आच्छादनाने पाण्याच्या तीन-पाच फेऱ्यांची बचत होते. खोडव्याचेही योग्य व्यवस्थापन करावे असे विश्वजित पाटील म्हणाले. सभासद विनोद पाटील यांनी कारखान्याकडून ऊस विकास योजना, खते, रोपे, खोडवा पीक व्यवस्थापन यांचे मार्गदर्शन सुरू असल्यामुळे ऊस उत्पादनात वाढ शक्य असल्याचे सांगितले. एन. बी. कमते, सचिन पाटील, ऊस विकास अधिकारी अभिषेक कदम, शुभम पाटील,सभासद संदीप पाटील, अरुण माने आदी उपस्थित होते.