बेळगाव : जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी यंदाच्या गळीत हंगामासाठी उसाची एफआरपी जाहीर केली आहे. यामध्ये रेणुका साखर कारखान्याने (सौंदत्ती) सर्वाधिक ३,७७३ रुपये दर जाहीर करून आघाडी घेतली आहे. त्यापाठोपाठ कोल्हापूर जिल्ह्यातील माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या मालकीच्या बेडकीहाळ साखर कारखान्याने दर दिला आहे. त्यांच्या बेडकिहाळ (ता. चिक्कोडी) येथील वेंकटेश्वर पॉवर प्रोजेक्ट लिमिटेडने ३,६९३ रुपये दर जाहीर केला आहे.
जिल्हाधिकारी डॉ. नीतेश पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कारखान्यांना हंगाम सुरू करण्यापूर्वी एफआरपीचे दर जाहीर करण्याची सक्ती करण्यात आल्याचे म्हटले आहे. त्यानुसार २७ साखर कारखान्यांनी एफआरपी जाहीर केली आहे. दरम्यान, जिल्ह्यातील कारखान्यांनी ३,५०० च्यावर दर दिल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. मात्र, कारखान्यांनी जाहीर केलेला दर तोडणी – वाहतूक वजा करून आहे की कसे, याचा खुलासा झालेला नाही.
बेळगाव शुगर्स प्रा.लि. हुदली कारखान्याने ३६५७ रुपये, दूधगंगा कृष्णा सहकारी साखर कारखाना, चिकोडीने ३५८६ रुपये, धनलक्ष्मी सहकारी साखर कारखाना, रामदुर्गने ३६५७ रुपये, घटप्रभा सहकारी साखर कारखाना, संगनकेरी (ता. गोकाक) या कारखान्याने ३३४६ रुपये, गोकाक शुगर्स, कोळवी (ता. गोकाक) कारखान्याने ३६४१ रुपये, हालसिध्दनाथ सहकारी साखर कारखाना, निपाणी कारखान्याने ३६११ रुपये आणि हर्षा शुगर्स लि. सौदत्ती कारखान्याने ३३७१ रुपये दर जाहीर केली आहे. संकेश्वर येथील हिरण्यकेशी सहकारी साखर कारखान्याने ३४८८ रुपये प्रती टन आणि रेणुका शुगर्स लि. बुट्टी (ता. अथणी) कारखान्याने ३५३४ रुपये दर जाहीर केला आहे. दि उगार शुगर्स वर्क्स लि. उगार खुर्द कारखान्याने ३५६४ रुपये, विश्वराज शुगर्स इंडस्ट्रिज लि. बेल्लद बागेवाडी कारखान्याने ३६३२ रुपये आणि अथणी शुगर्स प्रा.लि. कारखान्याने ३५१८ रुपये दर घोषित केला आहे.