बेळगावी : रामदुर्ग तालुक्यातील उडूपुडी गावातील शिवसागर साखर कारखान्यातील ३८० कामगारांना अचानक नोकरीवरून काढून टाकण्यात आल्याचे वृत्त स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिले आहे. अचानक केलेल्या टाळेबंदीमुळे एक दशकाहून अधिक काळ कारखान्यात काम करणारे कामगार संकटात सापडले आहेत.
‘द हंस इंडिया’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, दहा वर्षांहून अधिक काळ हे कामगार स्थानिक अर्थव्यवस्थेचा आधार असलेल्या शिवसागर साखर कारखान्यात काम करत होते. तथापि, आर्थिक गैरव्यवस्थापनामुळे २०१७ मध्ये कारखाना आणि त्याच्याशी संबंधित ॲग्रो प्रॉडक्ट्स लिमिटेड कंपनी बंद करण्यात आली. त्यानंतर अरिहंता शुगर इंडस्ट्रीजने भाडेतत्त्वावर कामकाज सुरू केले आणि गेली तीन वर्षे हा कारखाना चालवला जात होता. अलीकडेच अरिहंता शुगर इंडस्ट्रीजने कारखाना नवीन मालकांच्या ताब्यात दिला. काही दिवसांपूर्वीच नव्या मालकांनी ताबा घेतला आहे. मात्र, नवीन व्यवस्थापनाने नियमीत कामकाज सुरू करण्याऐवजी सर्व ३८० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याचा निर्णय घेतला.
याबाबत कामगार बसवराज लिंगारेड्डी यांनी सांगितले की, आम्ही कारखान्याचे कायम कर्मचारी आहोत. गेल्या १५ वर्षांपासून येथे काम करतो. मात्र, आम्हाला कोणतेही कारण नसताना काढून टाकण्यात आले. नवीन मालकांना आमचा रोजगार चालू ठेवावा. जोपर्यंत आमची नोकरी परत मिळत नाही, तोपर्यंत आम्ही आमचा संघर्ष सुरूच ठेवू. दरम्यान, यावर तोडगा काढण्यासाठी शेकडो विस्थापित कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन जिल्हाधिकारी नितीश पाटील यांना निवेदन दिले. त्यांनी आमचा रोजगार चालू ठेवावा, अशी मागणी केली. अचानक बडतर्फ केल्याप्रकरणात हस्तक्षेप करण्याची विनंती त्यांनी केली.