मांड्या : मायशुगर साखर कारखान्यात हंगाम २०२२-२३ साठी ऊस गाळपाच्या कामाला सुरुवात झाली आहे. याबाबत साखर मंत्री शिवानंद पाटील यांनी सांगितले की, सध्याच्या हंगामात जवळपास ३ लाख टन गाळप होण्याची अपेक्षा आहे. हंगामात प्रती दिन ३,००० टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट निश्चित केले आहे, असे ते म्हणाले. पुढील काही काळात हे उद्दिष्ट ५,००० टनापर्यंत वाढवले जाऊ शकते. १५०० ते २००० टन प्रती दिन ऊस गाळपाने सुरुवात केली जाईल. टर्बाइनमध्ये तांत्रिक बिघाडामुळे गाळपास थोडा उशीर झाला असे मंत्री पाटील यांनी सांगितले.
मंत्री पाटील म्हणाले, यावर्षी कारखाना शेतकऱ्यांना ऊस खरेदीनंतर सरकारने निश्चित केलेला योग्य आणि लाभदायी दर (एफआरपी) देईल. ते म्हणाले की, कमी उताऱ्यामुळे गेल्या वर्षी शेतकऱ्यांना २८०० रुपये प्रती टन ऊस दर देण्यात आला होता. जिल्ह्याचे पालकमंत्री एन. चेलुवरायस्वामी यांनी सांगितले की, सरकारच्या हस्तक्षेपामुळे कारखाना सुरू झाला आहे. मायशुगर यशस्वी कामकाज करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
खासदार सुमलता अंबरीश यांनी गळीत हंगाम सुरू झाल्याचा फायदा विभागातील शेतकऱ्यांना होईल असे सांगितले.
कारखान्याने ऊस गाळपासाठी आधीच कामगार तैनात केले आहेत. तोडणीनंतर २४ तासात ऊस गाळप करण्याची तयारी करण्यात आली आहे. व्यवस्थापनाने पंधरवड्यात ऊस बिले देण्याचे नियोजन केले आहे असे सांगण्यात आले.