बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील साखर कारखान्यांपैकी बहुतांश कारखान्यांनी बॉयलर अग्निप्रदीपन केला तर काही साखर कारखान्यांनी गव्हाणीत ऊस टाकून पूजन केले. राज्य साखर आयुक्तांनी यंदा राज्यातील साखर कारखान्यांनी एफआरपीमध्ये २५० रूपयांची वाढ केली आहे. त्यामुळे गतवर्षी एफआरपीची रक्कम टनाला ३१५० इतकी होती. ती यंदा ३४०० रूपये देण्याचा आदेश दिला आहे. त्यानुसार, सध्या जिल्ह्यात २६ साखर कारखाने सुरू होण्यासाठी सज्ज होत आहेत. परंतु, ऊस दर मात्र एकाही साखर कारखान्याने जाहीर केलेला नाही. या ऊस दराची शेतकऱ्यांना उत्सुकता आहे.
दरवर्षी बेळगाव, रायबाग, अथणी, कागवाड, चिकोडी, सौंदत्तीसह बहुतांशी साखर कारखाने ऑक्टोबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात सुरू होतात. परंतु, यंदा पाऊस लांबला आहे. आता ८० टक्के साखर कारखान्यांनी हंगामाची घोषणा केली आहे. कारखानदारांना गळीत हंगामाची उत्सुकता आहे. अनेक साखर कारखान्यांना साखर उताऱ्यानुसार एफआरपी द्यावी लागणार आहे. साखर आयुक्तालयाने जाहीर केलेला हा दर सरासरी १०.२५ उतारा असल्यास ३४०० रूपये दर जाहीर केला आहे. महाराष्ट्र व कर्नाटकच्या सीमेवर होणाऱ्या ऊस परिषदांमध्ये पहिला हप्ता ३५०० रूपये घेतल्याशिवाय ऊस दिला जाणार नाही, अशी भूमिका शेतकरी संघटनेने घेतली आहे. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ३७०० रुपये पहिली उचल मागीतली आहे. त्यामुळे ऊस दराची कोंडी कारखानदार कधी फोडतील याची उत्सुकता आहे.
साखर उद्योगाबाबत अधिक माहिती आणि अपडेट्ससाठी Chinimandi.com वाचत राहा.