म्हैसूर : म्हैसूर आणि चामराजनगर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी गेल्या हंगामातील थकीत बिलांच्या मागणीसाठी मंगळवारी शहरातील सिद्धार्थनगरात उपायुक्त कार्यालयासमोर निदर्शने केली. बेंगळुरूमध्ये त्यांच्या ३९ दिवसीय धरणे आंदोलनानंतर राज्य सरकारकडून जाहीर केलेला अतिरिक्त ऊस दर देण्यात आलेला नाही. त्यामुळे कर्नाटक ऊस उत्पादक संघाच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी उपायुक्त कार्यालयावर मोर्चा काढला. पोलिसांनी त्यांना प्रवेशद्वारावर अडवले.
शेतकरी आणि पोलिस यांच्यातील झटापटीनंतर शेतकऱ्यांनी पोलिस तसेच सरकारविरोधात घोषणाबाजी केली. नंतर त्यांना उपायुक्त कार्यालयाच्या आवारात थांबण्यास परवानगी देण्यात आली. अतिरिक्त उपायुक्त कविता राजाराम यांनी निवेदन स्वीकारले. उपायुक्त के. व्ही. राजेंद्र यांच्यासमोर या मागण्या ठेवल्या जातील असे त्यांनी सांगितले. साखर कारखान्यांनी गेल्या हंगामातील प्रती टन १५० रुपयांची थकबाकी हंगाम सुरू होण्यापूर्वी द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.
केंद्राने जाहीर केलेला १०.२५ टक्के उताऱ्यासाठी ३,१५० रुपये एफआरपी अपुरी असल्याचे सांगत शेतकऱ्यांनी उत्पादन खर्च वाढल्याचे सांगत ९.५ टक्के रिकव्हरीला ४,००० रुपये प्रती टन दर देण्याची मागणी केली. शेतकरी आणि कारखानदारांच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्याचीही मागणी करण्यात आली. तोडणी, वाहतुकीसह ऊस दर ठरवावा, राज्य सरकारने राज्य सल्लागार मूल्य निश्चित करण्यासाठी बैठक बोलावण्याची मागणी केली.
ऊसाचा वजनकाटा बाहेर लावण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. कर्नाटक ऊस उत्पादक शेतकरी संघाच्या नेतृत्वाखाली सचिव अटीहल्ली देवराज यांनी म्हैसूर आणि चामराजनगर युनिटच्या पदाधिकाऱ्यांसह हे आंदोलन केले.