मंड्या : राज्य सरकारच्या मालकीच्या म्हैसूर शुगर कंपनी (Mysugar) मध्ये शुक्रवारी जिल्ह्याचे पालकमंत्री एन. चेलुवरायस्वामी आणि साखर मंत्री शिवानंद पाटील यांच्या हस्ते गळीत हंगामाला सुरुवात करण्यात आली. गाळपादरम्यान कारखान्यात एका विशेष पुजेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा कृषीमंत्री चेलुवरायस्वामी म्हणाले की, राज्य सरकार जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी कारखान्याला सर्वोतोपरी मदतीचे प्रयत्न करीत आहे. मुख्यमंत्री सिद्धारमय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी कारखान्याच्या पुनरुद्धारासाठी ५० कोटी रुपयांचा निधी जारी केला आहे.
मंत्री पाटील म्हणाले की, शेतकऱ्यांना ऊस बिले देण्याची जबाबदारी सरकारवर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कारखान्याला जास्तीत जास्त ऊस पुरवठा करावा. सरकार शेतकऱ्यांना ऊस पुरवठ्यानंतर खाजगी कारखान्यांप्रमाणे दर देईल. ते म्हणाले की, आपला ऊस कारखान्याला पाठवावा. कारण, गेल्यावर्षी पूर्ण क्षमतेने गाळप न झाल्याने कारखान्याला तोटा सहन करावा लागला आहे. कारखान्याला जास्तीत जास्त ऊस आला, तर जास्त गाळप होवून नुकसान भरून काढणे शक्य आहे. यावेळी आमदार रविकुमार गनिगा, रमेश बंदीसिद्दे गौडा आणि इतर उपस्थित होते.
कारखान्याला रुळावर आणण्याचे अनेक प्रयत्न असफल झाल्यानंतर अनेक खासगी गुंतवणुकदारांनी माय शुगर कारखाना चालविण्यात रस दाखवला होता. माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई सरकारने कारखान्याचे पुनरुज्जीवन करण्याची घोषणा केली आणि यासाठी ५० कोटी रुपयांची तरतुद केली होती. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या होत्या.
Mysugar च्या पुनरुज्जीवनामुळे मंड्यातील उत्पादकांना मोठा दिलासा मिळणार आहे. मंड्यामध्ये पांडवपुरा साखर कारखान्यासह इतर कारखाने असूनही त्यांना शेजारील जिल्ह्यांमध्ये ऊस पाठवावा लागत होता. कर्नाटकात ७० कारखाने आहेत. यापैकी केवळ दोन ते तीन कारखाने सरकारकडून चालवले जातात. उर्वरीत कारखान्यांची मालकी खासगी अथवा सहकारी समित्यांकडे आहे.