कर्नाटक : सीमाभागात ऊस हंगाम अंतिम टप्प्यात, तोडणी मजुरांना परतीचे वेध

बेळगाव : निपाणी तालुक्यासह सीमाभागात ऊस तोडणी हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. बहुतांश साखर कारखान्यांनी यांत्रिक पद्धतीने ऊस तोडणी केल्याने झपाट्याने ऊसतोडणी केली झाली. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात उन्हाची तीव्रता वाढल्यानंतर या कामगारांनी ऊस तोडणीचा दर वाढविला होता. आता हंगामाची सांगता होत असल्याने मजूरांना घरचे वेध लागले आहेत. ऊस तोडणीसाठी आलेले बीड, लातूर, उस्मानाबाद परिसरातील मजूर आपापल्या घरी परतू लागले आहेत.

यंदा कर्नाटक सीमाभागात सुरुवातीस कमी प्रमाणात ऊस तोडणी मजूर दाखल झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांकडून चिंता व्यक्त झाली. त्यामुळे यंदा पहिल्यांदाच यांत्रिक पद्धतीचा वापर मोठ्या प्रमाणावर केला गेल्याने शेतकऱ्यांचे ऊस झपाट्याने तोडले गेले. आता बहुतांशी शिवार रिकामी झाली आहेत. त्यामुळे मजुरांना आता परतीचे वेध लागले आहेत. याबाबत बीड जिल्ह्यातील केज येथील ऊस तोडणी मजूर सुदाम पिष्टे यांनी सांगितले की, ऊस तोडणीच्या हंगामाच्या पार्श्वभूमीवर दिवाळीपूर्वीच अनेक टोळ्या सीमाभागात दाखल झाल्या होत्या. पण विधानसभा निवडणुकीमुळे काही टोळ्या उशिरा दाखल झाल्या. आता हंगाम अंतिम टप्प्यात आल्याने कुटुंबासह जनावरे घेऊन गावाकडे परतत आहोत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here