बेंगळुरू : कर्नाटक लवकरच इथेनॉल उत्पादनात देशात अग्रस्थानी असेल, राज्यातील आणखी ६० साखर कारखान्यांना इथेनॉल उत्पादनाची परवानगी देण्याची प्रक्रिया सुरू आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केले.
ते म्हणाले की, हा निर्णय महत्त्वपू्र्ण आहे. देशात पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण २० टक्के करण्याची योजना प्रगतीपथावर आहे. मुख्यमंत्री बोम्मई यांनी एस. निजलिंगप्पा शुगर इन्टिट्यूट बेळगाव आणि बक्वेट कन्सल्टन्सी अँड इंजिनीअरिंग प्रायव्हेट लिमिटेडकडून आयोजित ‘कर्नाटकमध्ये इथेनॉल उत्पादन’ या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या एका सेमिनारमध्ये बोलताना सांगितले की, राज्यात सध्या ३२ साखर कारखाने इथेनॉलचे उत्पादन करतात. तर अन्य ६० कारखाने उत्पादन सुरू करण्यासाठी मंजुरीच्या विविध टप्प्यांवर आहेत.
मुख्यमंत्री कार्यालयाकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनानुसार, कर्नाटकमध्ये इथेनॉल धोरण तयार करण्यात येत आहे. याअंतर्गत उत्पादकांना राज्य आणि केंद्र सरकारकडून प्रोत्साहन दिले जाईल. बोम्मई यांनी इथेनॉल उत्पादन आणि वापराबाबत अधिकाधिक संशोधनाचे आवाहन केले. ते म्हणाले की, हायड्रोडन हरित ऊर्जेचा मोठा स्त्रोत म्हणून विकसित होत आहे. देशातील जवळपास ४३ टक्के नवऊर्जेचे उत्पादन कर्नाटकमध्ये करण्यात येत आहे.