नैरोबी : साखरेच्या पॅकेजिंगबाबत कडक नियम लागू करण्याची मागणी साखर उत्पादकांनी केली आहे. त्यातून किरकोळ विक्रेत्यांकडून त्यांच्या नावावर पुन्हा होणारी रिपॅकेजिंग आणि रिब्रँडिंगच्या प्रकारातून केला जाणारा दुरुपयोग टाळता येणे शक्य होणार आहे. केनिया असोसिएशन ऑफ मॅन्युफॅक्चरर्सच्या (केएएम) माध्यमातून उद्योगपतींनी सांगितले, देशात मोठ्या प्रमाणावर साखरेची तस्करी होत आहे. गुणवत्ता तपासणी न करता बेधडक या साखरेची विक्री सुरू आहे. ग्राहकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हे प्रकार अतिशय घातक आहेत.
केनिया असोसिएशन ऑफ मॅन्युफॅक्चरर्सने सांगितले की, सरकारने साखरेच्या तस्करीला आळा घालण्यासाठी अंतर्गत समित्यांची तपासणी, देखरेख वाढवली पाहिजे. केनिया ब्युरो ऑफ स्टँडर्डसकडून (केईबीएस) नियम लागू करण्यासह स्थानिक स्तरावर उत्पादीत केलेली साखर आणि आयात केलेली साखर यांच्या रिपॅकेजिंगचे नियम लागू केले गेले पाहिजेत.
केएएमचे साखर उप विभागाचे अध्यक्ष जॉयस ओपोंडो यांनी सांगितले की, साखर तस्करीमुळे गुणवत्तेशी तडजोड केली जाते. यासोबतच सरकारी महसुलाचेही मोठे नुकसान होत आहे.