नैरोबी : साखर कारखान्यांकडून अस्थायी रुपात उत्पादन बंद झाल्याने न्यान्जा आणि पश्चिम केनियातील साखर पट्ट्यात शेतकरी आणि कामगारांची पुढील वाट बिकट होईल अशी शक्यता आहे.
कृषी आणि अन्न प्राधिकरणा (एएफए) द्वारे उसाच्या परिपक्वतेसाठी साखरेचे उत्पादन चार महिन्यांपेक्षा अधिक काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
१३ जुलै रोजी किसुमूमध्ये आयोजित बैठकीनंतर एएफएने परवानाधारक कारखान्यांना कामकाज पुन्हा सुरू करण्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. राय परिवाराकडून चालविली जाणारी पश्चिम केनिया आणि ओलेपिटो साखर कारखान्याचे गाळप बंद करण्यात आले आहे. शेजारील बुटाली साखर कारखान्यात अनिश्चित काळासाठी कामकाज बंद करण्यात आले आहे. बुटालीचे व्यवस्थापकीय संचालक संजय पटेल यांनी सांगितले की, या कालावधीत कारखान्यांची देखभाल केली जाईल. कामकाज लवकरच सुरू होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
पश्चिम केनियातील साखर कारखान्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ३१ जुलैपर्यंत सवैतनिक वार्षिक सुट्टी घ्यावी लागेल. कंपनीचे कार्यकारी संचालक सोहन शर्मा म्हणाले की, कंपनी या कालावधीचा वापर देखभाल-दुरुस्तीच्या प्रक्रियेसाठी करेल. कंपनी सर्व कर्मचाऱ्यांशी चांगला व्यवहार करेल असे ते म्हणाले.
केनिया युनियन ऑफ शुगरकेन प्लांटेशन अँड अलाइड वर्कर्सचे महासचिव फ्रान्सिस वांगारा यांनी सरकारकडे गरजेनुसार १,८५,००० टनापैकी काही आयात परवाने देण्याची मागणी केली आहे. यामध्ये १६ परवानाधारक कारखानदारांसाठी ५० टक्के कोटा ठेवणे गरजेचे आहे असे ते म्हणाले.