नैरोबी / कंपाला : केनियामध्ये एकूण आयात होणाऱ्या साखरेपैकी ४३ टक्के आयात युगांडामधून करणार आहे. यामुळे केनियाला साखरेचा पुरवठा आणि युगांडाला साखरेसाठी जवळची बाजारपेठ मिळणार आहे. केनिया आणि युगांडा या दरम्यानच्या गेल्या एक वर्षापासून सुरू असलेल्या वादानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
कंपालामध्ये आयोजित एका बैठकीत युगांडा आणि केनिया यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. केनियाकडून व्यापार विभागाचे कॅबिनेट सचिव बेट्टी मैना यांनी सांगितले होते की, दोन्ही देशांकडून ९०००० टन साखरेची आयात-निर्यात होईल. केनियातील करारानुसार युगांडाला सुमारे तीन वर्षापासून जादा साखर निर्यातीस मंजूरी देण्यात आली होती. मात्र, केनियाने गेल्यावर्षी ९०,००० टनापैकी फक्त २०,००० टन साखर आयातीची अनुमती दिली होती.
आता युगांडा दरवर्षी केनियाला ९०,००० टन साखरेची निर्यात करेल. युगांडा आणि केनिया या दोन्ही देशांतील वादावर तोडगा काढण्यात आला आहे. युगांडा साखर उत्पादक संघाच्या म्हणण्यानुसार, गेल्या दोन वर्षात लागू केलेल्या निर्बंधांमुळे सध्या १,५०,००० टन साखरेचा साठा झाला आहे. टांझानियानेही सुमारे तीन वर्षांपूर्वी युगांडा कडील साखरेला आपल्या बाजारपेठेत येण्यापासून रोखले आहे.