वायनाड : पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करणाऱ्या गांडूळ अळीपासून बचावासाठी शेतकऱ्यांना दक्षतेची सूचना कृषी विभागाने केली आहे. वायनाड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सावध रहावे असे सांगण्यात आले आहे. जिल्ह्याच्या विविध भागात मक्का आणि इतर बागांमध्ये या किटकांचा हल्ला झाल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे. शेतकरी धास्तावले असल्याने कृषी विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या आक्रमक किटकांमुळे देशभरात विविध ठिकाणी पिकांचे नुकसान झाल्याचे कृषी अधिकारी सजीमोन के. वर्गीस यांनी सांगितले.
अमेरिकेतून २०१६ मध्ये आफ्रिकेत आलेल्या या किटकाचा फैलाव जून २०१८ मध्ये भारतात झाला. ही गांडूळ अळी ८०हून अधिक प्रकारच्या वृक्षांच्या पानांचे आणि मुळांचे नुकसान करतात. मक्का, तांदूळ, ऊस, भाजीपाला, कापूस आदी मोठ्या पिकांचे मोठे नुकसान होते.
दोन वर्षांपूर्वी त्रिशूर आणि मलप्पूरम जिल्ह्यात मक्याच्या पिकावर या किटकांचा फैलाव होऊन मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर त्याच्या नियंत्रणासाठी उपाययोजना केल्या होत्या. अलिकडे डिसेंबर महिन्यात एका विभागातील सर्वेक्षणात दोन ते चार महिन्यांच्या पिकावर याचा फैलाव झाल्याचे आढळले होते. या किटकाची मादी पानांवर १०० ते २०० अंडी घालते. अंड्यातून येणारे किडे पानांचा खालचा भाग फस्त करतात आणि पाने पांढरी पडतात असे अधिकाऱ्यांनी सांगितले. जर पिकांचे नुकसान झाले तर शेतकऱ्यांनी कृषी विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.