सातारा: खंडाळा व किसनवीर या दोन साखर कारखान्यांवर ८५ हजार सभासद शेतकऱ्यांचा संसार अवलंबून आहे. मी सत्तेसाठी किंवा स्वार्थासाठी पक्ष सोडलेला नाही. सत्तेचा हव्यास असता तर पहिल्याच दिवशी कॅबिनेट मंत्री झालो असतो. सुमारे एक हजार कोटींचे कर्ज असणारे दोन्ही साखर कारखाने ताब्यात घेण्याचे धाडस आम्ही सभासद शेतकऱ्याच्या हितासाठी केले. लिलावाच्या वाटेवर असलेले सभासदाच्या मालकीचे दोन्ही साखर कारखाने वाचावेत म्हणून मी कॅबिनेट मंत्रीपद नाकारले. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेला शब्द पाळला असून कारखान्याला थकहमी मिळाली आहे, असे प्रतिपादन आ. मकरंद पाटील यांनी केले. बोरी (ता. खंडाळा) येथील अमरदीप नेहरू युवा मंडळातर्फे आयोजित राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
आमदार मकरंद पाटील म्हणाले, गेल्यावर्षी कारखाने अडचणीत असतानाही ३,००० रुपये दर दिला आहे. भविष्यात सोमेश्वर व साखरवाडी या दोन्ही साखर कारखान्यापेक्षा ऊसाला जास्त दर दिला जाईल असे आ. मकरंद पाटील म्हणाले. यावेळी आ. पाटील यांचा खंडाळा व किसनवीर साखर कारखान्याला आर्थिक मदत मिळण्यासाठी पाठपुरावा केल्याबद्दल पंचायत समिती खेड गटातील सभासद व ग्रामस्थांच्यावतीने नागरी सत्कार करण्यात आला. दत्तानाना ढमाळ, मनोज पवार, राजेंद्र तांबे, सरपंच गणेश धायगुडे-पाटील, भगवान धायगुडे, नारायण धायगुडे, माजी सरपंच बापूराव धायगुडे, भीमराव धायगुडे, संतोष धायगुडे, अंकुश धायगुडे, प्रल्हाद धायगुडे, दादासाहेब शेळके, अॅड. गजेंद्र मुसळे, विजय धायगुडे, रमेश धायगुडे, मारुती धायगुडे, बाळासाहेब शेडगे आदी उपस्थित होते.
साखर उद्योगाच्या बातम्यांबद्दल अधिक वाचण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.