आज लातूर-उमरगा मार्गावर किल्लारी साखर कारखान्याच्या प्रवेशद्वारासमोर रास्तारोको आंदोलन करण्यात आले. किल्लारी शेतकरी सहकारी साखर कारखाना सुरु करण्यासाठी शासनाने १५ दिवसात निर्णय घ्यावा याकरिता कारखाना बचाव कृती समितीच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले.
किल्लारी साखर कारखाना हा सभासद, ऊस उत्पादक, कारखाना कर्मचारी आणि व्यापाऱ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. सध्या हा कारखाना अवसायकाकडे असून कारखान्यावर साडेतीन कोटींचे कर्ज आहे. कारखाना सुरु करण्यासाठी वेळेवर टेंडरच काढले जात नाही आणि हा कारखाना तीन तालुक्यांच्या सीमेवर असल्यामुळे या कारखान्याचे एकूण २० हजार सभासद आहेत.
लागवड केलेल्या उसाचे करायचे काय?
सध्या या भागात सहा लाख एकरवर उसाची लागवड करण्यात आली असून हा ऊस कुठे पाठवायचा असा प्रश्न ऊस शेतकऱ्यांना पडला आहे. मुख्यमंत्र्यांनी स्वीय सहाय्यकानी कारखाना सुरु करण्याचे सांगितले होते परंतु अजूनही कारखान्याविषयी कोणतीच हालचाल सुरु झालेली नाही. कारखाना सुरु करण्याकरिता आता टेंडर काढावे लागते कारण जुलैमध्ये मशीनरीची दुरुस्ती करून ऑक्टोबरमध्ये कारखाना सुरु होतो.
कारखाना कृती समितीने मुख्यमंत्री, सहकारमंत्री, पालकमंत्यांच्या भेटी घेऊन देखील कारखाना सुरु करण्याबाबत कोणतीच हालचाल झाली नाही तर नेहमीप्रमाणेच आश्वासने मिळत राहिलीत. हा कारखाना या हंगामात सुरु करण्यात यावा या प्रमुख मागणीकरिता रास्तारोको आंदोलन करण्यात आले. यावेळी गुंडाप्पा बिराजदार, विजयकुमार सोनवणे, नानाराव भोसले, किल्लारीचे उपसरपंच अशोक पोतदार, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश पाटील, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजकुमार सस्तापुरे आदि उपस्थित होते. तसेच या आंदोलन दरम्यान कोणतीही चुकीची घटना घडू नये म्हणून पोलिश बंदोबस्त देखील ठेवला होता.
राज्यमार्गावरील वाहतूक तासभर ठप्प
या रास्ता रोको आंदोलनाच्या वेळी गुंडाप्पा बिराजदार, विजयकुमार सोनवणे, नानाराव भोसले, किल्लारीचे उपसरपंच अशोक पोतदार, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश पाटील, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजकुमार सस्तापुरे यांनी मनोगत व्यक्त केले. सभासदांनी नायब तहसीलदार शिवाजी कदम यांना आपल्या मागणीचे निवेदन दिले. हे आंदोलन सुमारे तासभर चालू असल्यामुळे राज्यमार्गावरील वाहून ठप्प होऊन खोळंबली. शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यानंतर मदत देण्यापेक्षा साखर कारखाना सुरु करून मदत कारवी, अशी मागणी कारखाना बचाव कृती समितीने केली. तसेच येत्या १५ दिवसात कारखाना सुरु करण्याविषयी निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला.