कोल्हापूर : अखिल भारतीय किसान सभा व मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्यावर्षीच्या उसाला प्रती टन ५०० रुपये अंतिम दर आणि यंदाच्या उसाला ३,५०० रुपये पहिली उचल द्यावी यासह विविध मागण्यांसाठी निदर्शने करण्यात आली. मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना देण्यात आले. मागण्या मान्य करून साखर कारखाने पूर्ण क्षमतेने सुरू करा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला. यावेळी प्रा. सुभाष जाधव, प्रा. आबासाहेब चौगुले व कॉ. दिनकर आदमापुरे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय साखर बाजारातील तेजी, बगॅस, मळी, इथेनॉलचे वाढलेले दर पाहता शेतकऱ्यांना दर देणे कारखानदारांना शक्य आहे. वाढलेला उत्पादन खर्च व गेल्या सहा – सात वर्षांपासून उसाचे स्थिर दर यामुळेच शेतकऱ्यांची आर्थिक ओढाताण होत आहे. त्यामुळे प्रती टन ३५०० रुपये दर द्यावा, अशी मागणी करण्यात आली. जिल्ह्यातील साखर कारखानदारांच्या ताठर भूमिकेमुळेच कारखाने पूर्ण क्षमतेने सुरू झालेले नाहीत. यावर्षी पाऊस कमी झाल्याने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होऊन हंगाम सुरू होणे गरजेचे आहे. साखर व उपपदार्थांच्या वाढलेल्या दराचा आढावा घेता गत हंगामातील उसाला प्रतिटन जादा ५०० रुपये मिळाले पाहिजे अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. यावेळी विकास पाटील, आप्पासो परीट, नारायण गायकवाड, राजेंद्र शिंदे, आनंदराव चव्हाण, रावसाहेब चोपडे, अमोल नाईक, अनिल जंगले यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.