सातारा : आमदार मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली किसन वीर व किसन वीर-खंडाळा हे दोन्ही कारखाने उत्तमरित्या सुरू आहेत. भविष्यात हे कारखाने फिनिक्स पक्ष्यांप्रमाणे भरारी घेतील, असा विश्वास आमदार श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर यांनी व्यक्त केला. भुईंज येथील किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगामाचा प्रारंभ प्रसंगी ते बोलत होते. साखर कारखान्यांसाठी सध्याचा काळ कसोटीचा आहे. यातूनही आमदार मकरंद पाटील निश्चित मार्ग काढतील, असे ते म्हणाले.
विधान परिषदेचे माजी सभापती, आमदार नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते गळीत हंगाम प्रारंभ झाला. किसन वीर कारखान्याचे चेअरमन आमदार मकरंद आबा पाटील, अर्चनाताई पाटील, सातारा जिल्हा बँकेचे चेअमरन नितिनकाका पाटील उपस्थित होते. संचालक रामदास इथापे व अनिता इथापे यांच्या हस्ते गव्हाणीचे विधिवत पूजन झाले. खंडाळा शेतकरी साखर कारखान्याचे चेअरमन व्ही. जी. पवार, व्हाईस चेअरमन राजेंद्र तांबे, शशिकांत पिसाळ, ज्येष्ठ नेते बाजीराव पाटील, कारखान्याचे ज्येष्ठ संचालक बाबासाहेब कदम उपस्थित होते.
यावेळी दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात प्रती टन ५० रुपयांचा हप्ता देणार असल्याची घोषणा करून आमदार मकरंद आबा पाटील म्हणाले, संस्थापक किसन वीर व तत्कालीन सहकाऱ्यांनी जांबच्या माळावर १९७२ साली कारखान्याचं रोपटं लावलेलं होतं. त्याचा आज कल्पवृक्ष झालेला आहे. कारखान्यावर दिग्गजांनी नेतृत्व केले. परंतु मध्यंतरी व्यवस्थापन चुकीच्या हातात गेल्यानं भ्रष्टाचार, अनियमितता सुरू झाली. मात्र, आम्हाला सभासदांनी सहकार्य केले. मागील एफआरपीची थकबाकी असतानादेखील त्यांनी भाग भांडवलाची रक्कम दिली. यामुळेच मी गेली दोन वर्ष बँकेचे कर्ज न घेता कारखाना सुरू करू शकलो. मागील हंगामातील एफआरपी, इतर देणी दिली आहेत. यामुळेच कारखान्याची विश्वासार्हता वाढली आहे. यंदा दोन्ही कारखाने पुर्ण क्षमतेने चालविण्याइतकी यंत्रणा सज्ज आहे. पहिल्या दिवसापासून दोन्ही कारखान्यांचे गाळप पूर्ण क्षमतेने होईल.
यावेळी उपाध्यक्ष प्रमोद शिंदे, वसंतराव मानकुमरे, बाळासाहेब सोळस्कर, नितीन भरगुडे पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. आमदार मकरंद आबा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कारखाना कार्यस्थळावर महाआरोग्य शिबिर झाले. कार्यक्षेत्रातील १४०० लोकांनी याचा लाभ घेतला. सुरुवातीला कारखान्याचे चेअरमन आमदार मकरंद आबा यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.