जाणून घ्या, उत्तर प्रदेशातील इथेनॉल उद्योगाची प्रगती

लखनौ : भारतामधील प्रमुख ऊस आणि इथेनॉल उत्पादकांपैकी एक असलेल्या उत्तर प्रदेश राज्यातील इथेनॉल अर्थव्यवस्थेने १२,००० कोटी रुपयांचा आकडा पार केला आहे. याशिवाय, राज्यात इथेनॉलची क्षमता २ बिलियन लिटर प्रती वर्ष नोंदविण्यात आली आहे. जी गेल्या पाच वर्षांपूर्वीच्या २४० मिलियन लिटर प्रती वर्षच्या तुलनेत आठ पट अधिक आहे.
बिजनेस स्टँडर्डमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, उत्तर प्रदेशातील साखर उद्योग आणि ऊस विकास विभागाचे अतिरिक्त सचिव संजीव भुसरेड्डी यांच्या म्हणण्यानुसार, आगामी काही वर्षात राज्याची इथेनॉल उत्पादन क्षमता २.२५ अब्ज लिटर प्रती वर्षपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. ते म्हणाले की, खासगी क्षेत्रातील डिस्टिलरीजनी गेल्या पाच वर्षात राज्यातील समग्र इथेनॉलची क्षमता वाढविण्यासाठी जवळपास ७,५०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.

उत्तर प्रदेश सरकार शेतकऱ्यांना योग्य दर देणे आणि या क्षेत्राला साखर बाजारातील गोंधळापासून वाचविण्यासाठी उसाच्या पिकाला आकर्षक इथेनॉल दर साखळीशी जोडण्याचा प्रयत्न करीत आहे. सध्याच्या २०२२-२३ या ऊस गळीत हंगामात पाच खासगी कारखाने साखर उत्पादनाऐवजी थेट उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मिती करतील. याशिवाय ७१ इतर कारखाने बी हेवी मोलॅसीसपासून इथेनॉल उत्पादनकरतील. यादरम्यान राज्यात ऊस क्षेत्र ३ टक्के अथवा ८४,००० हेक्टरने वाढून २.८५ मिलियन हेक्टर पेक्षा अधिक होईल असे अनुमान आहे. तर चालू हंगामात उसाचे उत्पादन २३४.८ मिलियन टन (MT) होण्याची शक्यता आहे. सध्याच्या गळीत हंगामात एकूण १२० कारखाने (९३ खासगी युनिट्स, २४ सहकारी आणि तीन युपी राज्य साखर महामंडळाची युनिट्स) सहभाग नोंदवतील.

उत्तर प्रदेशमध्ये इथेनॉलकडे ऊस वळविल्यानंतर जवळपास १.५ मिलियन टन साखरेच्या कपातीनंतर एकूण साखर उत्पादन ११ मिलियन टनापर्यंत पोहोचण्याचे अनुमान आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here