कोल्हापूर : करवीर तालुक्यातील कुडित्रे येथील कुंभी-कासारी सहकारी साखर कारखान्याने हंगाम २०२४-२५ मधील १६३ कोटी ११ लाखांची ऊस बिले ऊस पुरवठादार शेतकऱ्यांच्या, तर तोडणी-वाहतूक बिले वाहनमालकांच्या खात्यावर दि ७ रोजी वर्ग केल्याची माहिती चेअरमन आ. चंद्रदीप नरके यांनी दिली. २०२५-२६ हंगामाकरिता सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला ऊस कारखान्यास गळीतास पाठवून गळीत उद्दिष्ट पूर्ण करण्यास सहकार्य करावे, असे आवाहन चेअरमन आ. नरके यांनी केले.
आ. नरके म्हणाले, कारखान्याने या हंगामात यापूर्वी दि. १५ फेब्रुवारी २०२५ अखेर गाळपास आलेल्या ऊस बिलासाठी प्रतिटन ३३०० रुपयांप्रमाणे ऊस बिले संबंधित ऊस पुरवठाधारकांना अदा केली आहेत. उर्वरित दि. १६ फेब्रुवारी २०२५ ते हंगाम अखेरपर्यंत गळीतास आलेल्या ८९ हजार ८९२ मे.टन उसाची प्रतिटन ३३०० रुपयांप्रमाणे एकूण ऊस बिलाची २९ कोटी ६६ लाख ४६ हजार रुपये एवढी रक्कम संबंधित ऊस पुरवठाधारक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केली आहेत. तसेच डिझेल फरकासह तोडणी वाहतुकीची संपूर्ण बिलेही संबंधित ऊस तोडणी वाहनमालकांच्या खात्यात जमा करण्यात आली आहेत. कारखान्याने या हंगामामध्ये ४ लाख ९४ हजार २८२ मे. टन. उसाचे गाळप करून ६ लाख २५ हजार ५० किंवटल साखर पोत्यांचे उत्पादन केले. तर सरासरी साखर उतारा १२.६५ टक्के मिळाला आहे. यावेळी व्हा. चेअरमन राहुल खाडे, संचालक मंडळ, कार्यकारी संचालक धीरजकुमार माने आणि सचिव प्रशांत पाटील, कामगार प्रतिनिधी आदी उपस्थित होते.