कोल्हापूर : राजाराम साखर कारखान्याचे १२७२ सभासद ठरले अपात्र

कोल्हापूर : कसबा बावडा येथील राजाराम सहकारी साखर कारखान्याचे १२७२ सभासद अपात्र ठरले आहेत. याबाबत प्रादेशिक साखर सहसंचालकांनी गुरुवारी निकाल दिला आहे. राजाराम कारखान्याच्या सभासद अपात्रतेच्या मुद्द्यावरून राजकारण तापले होते. निवडणुकीपूर्वी महाडिक गटाने १२७२ सभासद वाढवले होते. त्या विरोधात आ. सतेज पाटील गटाने प्रादेशिक साखर सहसंचालक अशोक गाडे यांच्याकडे याचिका दाखल केली होती. गाडे यांच्या समोर या अपात्र सभासदांबाबत सुनावणी होऊन ते १२७२ सभासद अपात्र झाले. त्यामध्ये शौमिका महाडिक, ग्रीष्मा महाडिक यांच्यासह महाडिक कुटुंबातील १० जणांचा समावेश आहे. दरम्यान, राजाराम कारखान्याची झालेली निवडणूक बेकायदेशीर असून फेर निवडणुक घ्यावी अशी मागणी आमदार सतेज पाटील गटाने केली आहे.

याबाबत ‘लोकसत्ता’शी बोलताना आमदार सतेज पाटील म्हणाले कि, सर्वसामान्य सभासदांच्या पाठबळावर आम्ही निवडणुकीला सामोरे गेलो. या निवडणुकीमध्ये एकूण १२ हजार ३३६ इतके मतदान झाले. त्यामध्ये या अपात्र सभासदांच्या मतदानाचा समावेश होता. म्हणजे नियमित ११ हजार सभासदांचे मतदान झाले होते. यापैकी ५००० ते ५५०० मतं आमच्या आघाडीला मिळाली. त्यामुळे खऱ्या सभासदांचा कौल आमच्या आघाडीला मिळाला होता, हे सिध्द झाले आहे. या अपात्र सभासदांमुळे आमच्या उमेदवारांना १२०० ते १२५० मतांच्या फरकाने पराभव पत्करावा लागला. जर हे अपात्र सभासद मतदानास पात्र झाले नसते, तर कारखान्यावर आमचीच सत्ता आली असती. अखेर सत्याचा विजय झाला आहे, अशी प्रतिक्रिया आ. पाटील यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here