कोल्हापूर : पोलिसांनी विशेष शिबिरात शनिवारी जिल्ह्यातील ३१ पोलीस ठाण्यांमध्ये एकाच दिवसात ऊस तोडणी कंत्राटदारांच्याविरोधात फसवणुकीचे १४० गुन्हे दाखल केले. ऊस वाहतूकदारांकडून १,६५८ तक्रारी नोंदविण्यात आल्या आहेत. त्यांनी ऊस तोडणी ठेकेदारांवर १४ कोटी रुपयांच्या फसवणुकीचे आरोप लावले आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी वाहतुकदारांकडून खूप तक्रारी आल्यानंतर या शिबिराचे आयोजन केले होते.
बहुतांश तक्रारदारांनी सांगितले की, गळीत हंगामादरम्यान, ऊस तोडणी मजुरांच्या पुरवठ्यासाठी ठेकेदारांनी लाखो रुपये उचलले आहेत. मात्र, आवश्यक कामगारांचा पुरवठा करण्यात आला नाही. जिल्हा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे म्हणाले की, खूप तक्रारी आल्यानंतर आम्ही अशा विशेष शिबिरांचे आयोजन केले. वाहतूकदार जे खास करुन ऊस उत्पादक शेतकरी असतात, त्यांना ऊस तोडणी कामगार आणि ठेकेदारांनी फसवले आहे. बलकवडे म्हणाले की, मी सर्व ठाण्यांच्या प्रमुखांना सांगितले की, प्रत्येक तक्रारीची ठराविक कालावधीत तपासणी करावी आणि त्यासाठी खास पथके स्थापन करावीत.