कोल्हापूर : ऊस वाहतूकदारांना फसविणाऱ्या ठेकेदारांच्या मुसक्या आवळण्यासाठी १६ पोलिस पथके  

कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रात ऊस वाहतूकदारांच्या फसवणुकीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. याबाबतच्या वाढत्या तक्रारीनंतर कोल्हापूर जिल्ह्यात पोलिसांनी ऊस वाहतूकदारांच्या तक्रारी नोंदवून घेत कारवाईला सुरूवात केली आहे. जिल्हा पोलीस अधिक्षक महेंद्र पंडित यांनी कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानंतर आता पोलिसांकडून ऊस वाहतूकदारांची फसवणूक केलेल्या ठेकेदारांची धरपकड केली जात आहे. पोलिसांची १६ पथके ऊस तोडणी मजुरांच्या बीड, उस्मानाबाद, नांदेड, धुळे, लातूर, परभणी जिल्ह्यांमध्ये रवाना झाली आहेत.

या प्रकरणांतील कारवाईमध्ये आतापर्यंत ४० संशयितांना अटक झाली आहे. आता फसवणूक केलेल्या संशयितांच्या मालमत्तांवर बोजा चढविला जाईल असे पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सांगितले. कोल्हापूर जिल्ह्यात ठेकेदारांकडून शेतकऱ्यांची सुमारे शंभर कोटींपेक्षा जास्त फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. राज्यातील बारा जिल्ह्यातील १,२६९ संशयित ठेकेदार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाने स्वतंत्र पथक नेमून या प्रकरणांचा पर्दाफाश केला. आतापर्यंत ३८ जणांना अटक केली असून  आणखी काहींनी लवकरच ताब्यात घेतले जाईल असे सांगण्यात आले. २०१६ पासून अशी फसवणुकीची प्रकरणे वाढली आहेत. यंदा अशी फसवणूक होऊ नये यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत. याशिवाय, फसवणुकीतील रक्कम वसूल करण्यासाठी त्यांच्या मालमत्तांची कागदपत्रे जप्त करून त्यावर बोजा चढवण्याचे काम केले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here